पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये 'झीरो कोव्हिड' योजनेनुसार सुरु असणारे कडक लॉकडाउन निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चीनमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा लाखाच्पया घरात गेल्याचा अंदाज महामारीतज्ज्ञ व आरोग्य अर्थशास्त्री एरिक फीगल डिंग यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी रुग्णालयात मृतदेहांचे ढीग साचल्याचा धक्कादायक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र याबाबत चीन सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
चीनमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता महामारीतज्ज्ञ डिंग यांनी व्हिडिओ शेअर करत चीनमधील भयावह स्थितीबाबत भाष्य केले आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने रुग्णालयेही भरली आहेत. मृतांची संख्येतही वाढ झाल्याने शवागारातील कामगारांना अतिरिक्त काम कारावे लागत आहे.
महामारीतज्ज्ञ एरिक डिंग यांनी केलेल्या दाव्याला अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशननेही (एएचएमई) दुजोरा दिला आहे. 'एएचएमई'ने यापूर्वी म्हटलं होते की, २०२३ मध्ये चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट होवू शकतो.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होवू शकतो. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील ६० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होईल, असा इशारा महामारीतज्ज्ञ एरिक फीगल डिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.
डिंग यांेनी ट्विमध्ये म्हटलं आहे की, महामारीतज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील ९० दिवसांमध्ये चीनमधील ६० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. यामध्ये लाखो नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. कारण चीनमधील आरोग्य विभाग हे लसीकरण, रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि अतिदक्षता विभाग वाढविण्यात अपयशी ठरले आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठीचे औषधांचा अपुरा साठा आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये चीनमधील १.४ अब्ज नागरिकांवर महासंकट येवू शकते, असाही इशाराही त्यांनी दिला आहे.