राज्यात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा विदर्भात

राज्यात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा विदर्भात

आशिष देशमुख

पुणे : संपूर्ण राज्यात विदर्भ हा भाग सर्वात जास्त उष्णतेच्या लाटांचा सामना करतो. यात नागपूर शहरात 1 मार्च ते 15 जून या साडेतीन महिन्यांत सर्वाधिक 75 लाटा येऊन जातात, तर सर्वात कमी 24 लाटा सातारा जिल्ह्यात नोंदविल्या गेल्या आहेत. मध्य महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात सर्वाधिक 40 लाटा येतात. 'क्लायमेट हझार्डस् ऑफ इंडिया' या संशोधनात भारतीय हवामानशास्त्र विभागाने 1968 ते 2019 या पन्नास वर्षांतील संपूर्ण देशातील प्रत्येक गावात येणार्‍या उष्णतेच्या लाटांचा अभ्यास केला आहे.

यात गेल्या पन्नास वर्षांत आलेल्या एकूण लाटांसह प्रामुख्याने उन्हाळ्यात येणार्‍या लाटांचा अभ्यास केला आहे. यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा हे जिल्हे सर्वाधिक उष्णतेच्या लाटांचा सामना करतात; तर सर्वात कमी लाटा या कोकण, मध्य महाराष्ट्रात मोजल्या गेल्या आहेत.

कशी मोजतात उष्णतेची लाट?
किनारपट्टी भागात कमाल तापमान 30 अंशांवर गेले तर त्याला 'उष्णतेची लाट' म्हणातात तर मैदानी भागात हेच तापमान 37 ते 40 अंशांवर गेले की उष्णतेची लाट गृहीत धरली जाते. याला 'तीव्र उष्णतेची लाट' म्हणतात. यात सरासरी कमाल तापमानात 4.5 ते 6.5 अंश इतकी वाढ होते. हेच तापमान जर 45 ते 47 अंश सेल्सिअसवर गेले, तर त्याला 'अतितीव्र उष्णतेची लाट' संबोधले जाते.

अशा मोजल्या उष्णतेच्या लाटा (1 मार्च ते 15 जून)
नागपूर 75, चंद्रपूर 70, गोंदिया 68, भंडारा 72, गडचिरोली 70, वर्धा 65, यवतमाळ 62, वाशिम 56, हिंगोली 38, नांदेड 23, लातूर 32, नंदुरबार 31, धुळे 37, नाशिक 33, पालघर 27, ठाणे 27, रायगड 27, सिंधुदुर्ग 28, नगर 40, पुणे 27, सातारा 24, सांगली 26, कोल्हापूर 35, जळगाव 55, छत्रपती संभाजीनगर 30, जालना 40, सोलापूर 24, परभणी 40, बीड 39, उस्मानाबाद 28

नकाशात चॉकलेटी रंगात दाखविलेल्या राज्यात अतितीव्र उष्ण लाटा येतात. यात राजस्थान व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. येथे तापमान 40 ते 47 अंशांपर्यंत जाते. गडद तपकिरी व तपकिरी रंगांत त्या देशाचा बहुतांश भाग येतो. या भागात तापमान 40 ते 44 अंशांवर जाते. विदर्भाचे काही जिल्हे यात मोडतात. पिवळ्या रंगात दाखविलेल्या जिल्ह्यांत तुलनेने कमी लाटा येतात. नगर जिल्ह्यात सर्वाधिक लाटा येतात.

  • नागपूर करतेय सर्वाधिक 75 लाटांचा सामना
  • सर्वात कमी 24 लाटा सातारा जिल्ह्यात
  • मध्य महाराष्ट्रात नगर आघाडीवर
  • देशात राजस्थान,आंध्रप्रदेश आघाडीवर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news