Vel Amavasya : वेळ अमावस्याला शेतकऱ्यांनी केली शेतात पूजा; जाणून घ्या परंपरा आणि महत्व

Vel Amavasya : वेळ अमावस्याला शेतकऱ्यांनी केली शेतात पूजा; जाणून घ्या परंपरा आणि महत्व
Published on
Updated on

बीड; गजानन चौकटे : वेळ अमावस्येला (Vel Amavasya) ग्रामीण भागात 'येळवस अमावस्या' असं म्हटलं जातं. मूळात हा शब्द 'येळी अमावस्या' असून त्याचे नामकरण हे 'वेळ किंवा येळ अमावस्या' असे झाले. कर्नाटक राज्यात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळवस असते.

या दिवशी, शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी मायबाप लक्ष्मीआई पुढे करत असतात. सर्वदात्या धरती माय-माऊलीचे आपण काहीतरी देणं लागतो, या पवित्र भावनेने कर्नाटक आणि लगतच्या भागात म्हणजे आपल्या मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद आणि इतर काही भागात शेतकरी बांधव येळवस मोठ्या आनंदाने साजरी करण्याची जुनी प्रथा आहे. वेळ अमावस्येदिवशी (Vel Amavasya) शेतामध्ये कडब्याची खोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांची देखील पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच दगडांना चुण्याने रंगवून पांडवाची पूजा केली जाते.

खरं तर येळवण (Vel Amavasya) प्रथा शेतकऱ्यांसाठी एक वेगळीच आनंददायी पर्वणी असते. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही अमावस्या असते. या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते. त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं आणि ते शरीराला आवश्यकही असते. अशावेळी शेतकरी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा हा सण निराळा आहे, तसाच यासाठीचा बेतही निराळाच असतो.

Vel Amavasya : महाराष्ट्रातील येळवसची परंपरा नेमकी काय आहे?

भारतात सिंधूकालिन संस्कृतीपासून नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हापासून जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सात नद्या (सप्त सिंधू) भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त होते. त्याच सप्तसिंधू नदयांना आराध्य म्हणून पुजण्याची परंपरा सुरू झाली. लोक नदीच्या पाण्याचे पुजन करु लागले. पण कालांतराने बारामहिने वाहणाऱ्या नदया आटल्या. शेतकऱ्यांनी शेतात वावरातील पिक भिजवण्यासाठी, पिण्याच्या पाण्याकरता विहिरी खोदल्या. आता त्यातले पाणी हे या सप्त सिंधूचे प्रतिक म्हणून पुजले जाते. शेतात असलेल्या विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगडांना रंगवून त्याला पुजनाची परंपरा सुरु झाली आणि त्यांना आसरा म्हणून ओळखले जाऊ लागले.

Vel Amavasya : आसराचे महत्व

आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसराची पूजा येळवसच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्यांची खोप करुन केली जाते. शेतकरी बांधव संध्याकाळी ज्वारीच्या पेंढीचा टेंभा करुन शेतातल्या गहू, हरभरा या पिकांवरून तो ओवाळतात, जेणेकरून रबी हंगामातल्या या पिकांना कुणाची नजर लागू नये. त्यानंतर शेतकरी मंडळी घराकडे परततात.

आम्ही मुला बाळासह दर वर्षी मोठ्या आनंदात येळ अमावस्या साजरी करत असतो. त्याचबरोबर मित्र मंडळीला सुध्दा निमंत्रण देत असतो. या दिवशी शेतात मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. यामुळे सुख, समृद्धी लाभते अशी प्रथा आहे.
– प्रदिप पांचाळ, शेतकरी

 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news