कोल्हापूर, राजेंद्र जोशी : Vegetable Price : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असले, तरी टोमॅटोसह भाजीपाल्याचा चढता आलेख, गहू, तांदूळ, खाद्यतेलांच्या दरांनी खाल्लेली उचल पाहता केंद्राला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याला प्रामुख्याने जुलैमध्ये रेंगाळलेला पाऊस आणि जुलैमध्ये काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी जबाबदार असली, तरी बाजारातील टोमॅटोचे भाव खाली येण्यासाठी संपूर्ण देशाची नजर महाराष्ट्रातील टोमॅटोच्या नव्या पिकाकडे लागली आहे. या क्षेत्रातील काही जाणकार आणि वित्तीय संस्थांचे प्रमुख यांच्या मते, ही स्थिती दिवाळीपर्यंत राहण्याचा धोका आहे. तोपर्यंत कांद्याने डोळ्यांत पाणी आणले, तर सरकारची कसरत आणखी बिकट होणार आहे.
देशात यंदा तांदळाचे उत्पादन कमी आहे. यामुळे बाजारात तांदळाचे भाव भडकू लागल्याने केंद्र शासनाने तातडीचा उपाय म्हणून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणले. रशिया-युक्रेन युद्धाच्या पूर्वार्धाला गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध आणून आयातीला प्राधान्य देणार्या केंद्राने आता बाजारात गव्हाचा दर नियंत्रणा पलीकडे जाऊ लागल्याने गव्हाच्या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती कोसळल्याने भारतात काहीसा दिलासा मिळाला होता; पण आता पुन्हा खाद्यतेलाच्या भावाचा आलेख चढणीला लागला आहे. याखेरीज देशांतर्गत बाजारात साखरेचे भाव नियंत्रणात राहावेत आणि सणासुदीच्या काळामध्ये साखर मुबलक उपलब्ध राहावी, यासाठी केंद्राने निर्यात कोटा जाहीर करण्याविषयी मौन पाळताना जनतेला वाजवी दराची हमी दिली आहे.
Vegetable Price : तिमाहीत उमटणार प्रतिबिंब
टोमॅटोच्या लागवडीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक आणि मध्य प्रदेशातील रतलाम या ठिकाणी टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होते. चालूवर्षी जुलैमधील पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. टोमॅटोचे पीकही हाताला आले नाही. यामुळे नव्या लागवडीचा टोमॅटो केव्हा दाखल होतो, याकडे बाजाराचे लक्ष लागले असतानाच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राची लढाई अधिक तीव्र बनली आहे. याचे प्रतिबिंब रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आगामी तिमाही धोरणामध्ये उमटू शकते.
हे ही वाचा: