वेध लोकसभेचे -अटलजींच्या ‘त्या’ एका वाक्याने…

वेध लोकसभेचे
वेध लोकसभेचे
Published on
Updated on

'प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी..अटलबिहारी' ही भाजपची घोषणा 1980 सालाची. 4 एप्रिल, 1980 रोजी भाजपची स्थापना झाली, तेव्हा उत्साही कार्यकर्त्यांनी ही घोषणा दिली. पण प्रत्यक्षात अटलजींना पंतप्रधान होण्यासाठी 1996 साल उजाडले. सर्वाधिक सदस्य संख्या असणार्‍या पक्षाचे नेते म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना पाचारण केले. पण हे सरकार टीकले 13 दिवस. त्यानंतर 1998 (तेरा महिने), 1999 पासून कालावधी पूर्ण होईपर्यंत अटलजी पंतप्रधानपदी होते.

1996 च्या निवडणुकीत देशभर अटलजींचे वातावरण होते. दुर्देवाने भाजप व मित्रपक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तेरा दिवसानंतर अटलजींनी राजीनामा दिला, तो ऐतिहासिक भाषण करूनच. जनतेने त्यानंतर एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची राजवट अनुभवली. त्यामुळे नंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले, परंतु कालांतराने अवघ्या एका मतांनी सरकार पडले. त्यामुळे 13 महिन्यानंतर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली. 2004 पर्यंत अटलजी या पदावर कायम राहिले.

लातूरची ऐतिहासिक सभा

लातूर हा तसा काँग्रेसचा बालेकिल्‍ला. 1980 पासून 1999 पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर हे या मतदारसंघाचे खासदार. केंद्रात विविध पदे त्यांनी भूषविलेली. सलग सात वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या चाकुरकरांचे मताधिक्य पुढीलप्रमाणे-

1980 : 189,867
1984 : 85,537
1989 : 43,855
1991 : 58,718
1996 : 79,372
1998 : 3,327
1999 : 40,290

लातुरात 1999 च्या निवडणूक प्रचारासाठी अटलजींची सभा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी भाजपचे उमेदवार होते डॉ. गोपाळराव पाटील. डॉ. पाटील हे शहरातील नामांकित डॉक्टर, त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी संबंधित. यापूर्वीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. पण या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे व अन्य नेत्यांनी चाकूरकरांना हरवायचेच असा चंग बांधून रणनीती आखली होती. त्यासाठी अटलजींची सभा ठरली.

अटलजींच्या या दौर्‍यात मुक्‍कामाची व्यवस्था जितेश चापसी यांच्याकडे होती. सभेचे ठिकाण होते राजस्थान विद्यालयाचे मैदान. अटलजींचे विचार ऐकण्यासाठी तुफान गर्दी झालेली. वाजपेयी आपले शब्दिक बाण सोडत होते ते चाकूरकरांबद्दल काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. नेमके त्यांनी एक वाक्य उच्चारले, 'शिवराज पाटील जी ..आदमी अच्छा है.. लेकीन पार्टी गलत है…'. झाले…या एका वाक्याचा मतदारांवर परिणाम झाला आणि वातावरण अचानक बदलले. भाजपच्या हातात आलेला विजय पराभवात रूपांतरीत झाला.

त्यानंतर एका बैठकीला अटलजी उपस्थित होते, तेथे डॉ. पाटील व भाजपचे संघटनमंत्री शरदराव कुलकर्णी यांना पाहून अटलजी म्हणाले, माझ्या एका वाक्यामुळे तुमचा पराभव झाल्याचे कळाले, त्याचे मला वाईट वाटते. असे म्हणतात की, वाजपेयी यांच्या नात्यातील एका मुलीने त्यांना लातुरातील या विधानाबाबत विचारल्यावर अटलजी म्हणाले, राजकीय फायद्यासाठी मी कधीच खोटे बोलणार नाही, जे सत्य आहे ते मी बोलणारच. त्यानंतर डॉ. गोपाळराव पाटील यांना राज्यसभेवर संधी मिळाली, हा भाग वेगळा.

तारेतील मजकूर खोडला

1968 ला संभाीनगर येथे जनसंघाचे अधिवेशन होते. त्यावेळी व्यवस्थेत संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व अंबड येथील तत्कालिन नगरसेवक मधूकरअण्णा गोसावी हे होते. गोसावी यांनी अटलजींची एक आठवण पुस्तकात लिहून ठेवली आहे. ती अशी – उत्तर प्रदेशात संयुक्त विधायक दल सरकार सत्तारूढ होते. त्यात जनसंघाचे सदस्य सहभागी होते. नानाजी देशमुख सरकारवर लक्ष ठेवत. रेडिओवर दीनदयाळजी बातम्या ऐकत. एका बातमीत सांगितले, की उत्तर प्रदेश सरकार यापुढे गॅझेट उर्दू भाषेतूनही प्रसिद्ध करणार आहे. या बातमीने दीनदयाळजी अस्वस्थ झाले. त्यांनी नानाजी देशमुख यांना टेलिग्राम पाठवायला माझ्याजवळ दिला.

त्या तारेतला मजकूर असा होता, 'उत्तर प्रदेश सरकार का उर्दू में गॅझेट प्रकाशित करने का समाचार सुनकर दुख हुआ. ऐसी सरकार को तो अपनेही मौत से मरने देना चाहिए।' हा कागद घेऊन मी जाणार इतक्यात ते म्हणाले, थोडी देर ठहरो, रखो वहीं..मी कागद ठेवून दिला. त्या दिवशी संध्याकाळी अटलजी विमानाने अधिवेशनाला आले. दीनदयाळजींनी अटलजींना उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितले व मी नानाजींना तार पाठवित आहे, असे सांगून तारेच्या मजकुराचा कागद अटलजींना दिला. अटलजींनी वाचला. म्हणाले, ठीक है, लेकीन आखरी पंक्ती न हो तो अच्छा होगा, यावर दीनदयाळजींनी 'ऐसी सरकार को अपनेही मौत से मरने देना चाहिए' हे वाक्य खोडले आणि ती तार नानाजींना पाठवली गेली.

या दोन्ही प्रसंगातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वभावाचे वेगळे पैलू समोर येतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news