Prakash Ambedkar : कलेक्शनचे पैसे कोणाला दिले हे अनिल देशमुख यांनी सांगावे

Prakash Ambedkar : कलेक्शनचे पैसे कोणाला दिले हे अनिल देशमुख यांनी सांगावे

राज्यात गाजत असलेल्या कथीत १०० कोटीच्या वसूली प्रकरणात कलेक्शन तर झालं पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे अनिल देशमुख यांनी सांगावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

आंबेडकर म्हणाले की अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. अनिल देशमुख यांना माझी विनंती आहे. की, त्यांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये. तुम्ही कोणाला पैसे दिले, हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे.

Prakash Ambedkar : राजा आणि वजीराचे नाव पुढे येत नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांना पुन्हा एकदा १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केलाय.

सध्या परिस्थिती अशी आहे की फक्त जे मोहरे आहे त्यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, राजा आणि वजीराचे नाव पुढे येत नाही आहे. अशा स्थितीत न्यायालयाची भूमिका महत्वाची झाली आहे. न्यायालयाने राजकारणातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण बद्दल चे प्रकरण लवकर निकाली काढावी.राज्याच्या राज्यपालांनी ही या सर्व स्थिती बद्दल योग्य निर्णय घ्यावा. अशी त्यांना विनंती आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

आंबेडकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना नवाब मलिक यांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसांकडून संपत्ती घेतल्याची माहिती होती. तेव्हा त्यांनी का हे प्रकरण उचलले नाही किंवा कारवाई केली नाही.आज जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा ते लक्ष दुसऱ्या बाजूला वेधण्यासाठी हे सर्व बाहेर आणत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news