पुणे : यूजीसी नेटसह विविध परीक्षा एकाच दिवशी

पुणे : यूजीसी नेटसह विविध परीक्षा एकाच दिवशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यूजीसी नेट, एमपीएससी संयुक्त परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला, तर आयटीआय इन्स्ट्रक्टर आणि रेल्वेच्या ग्रुप-डी पदांच्या फेज-4 मधील परीक्षा एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे संबंधित परीक्षांसाठी अर्ज केलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थी, तसेच नेट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी केली आहे.

आयटीआय इन्स्ट्रक्टर या परीक्षेचे हॉल तिकीट सध्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, 28 आणि 29 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परंतु, भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदांच्या फेज-4 मधील मुंबई, कोलकाता आणि गोरखपूर झोनच्या परीक्षा दिनांक 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या आहेत. रेल्वेची ही पदभरती 2019 पासून प्रलंबित असून, चार वर्षांनंतर होत आहे.

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या असंख्य उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. परंतु, दोन्ही परीक्षांची केंद्रे एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये आल्याच्या तक्रारी परीक्षार्थिंनी केल्या आहेत. रेल्वेची परीक्षा केंद्रे, राज्यातील, तसेच राज्याबाहेरील असून, एकाच दिवशी या परीक्षा देणार्‍या उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी व्यवसाय व शिक्षण संचालनालयाने आयटीआय इन्स्ट्रक्टर या पदाच्या परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

त्याचबरोबर यूजीसी नेटच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन आणि इकोनॉमिक्समधील वेगवेगळ्या विषयांची परीक्षा 8 ऑक्टोबरला आहे. त्याच दिवशी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षादेखील आहे. त्यामुळे संबंधित सर्व परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, यावर तोडगा काढण्याची मागणी परीक्षार्थी, तसेच विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news