Varanasi Stadium : वाराणसीत PM मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्टेडियमची पायाभरणी; सचिनस तेंडुलकरची खास उपस्थिती

Varanasi Stadium : वाराणसीत PM मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्टेडियमची पायाभरणी; सचिनस तेंडुलकरची खास उपस्थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : Varanasi Stadium : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये क्रिकेटप्रेमींना मोठी भेट दिली. पंतप्रधानांच्या हस्ते येथे जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमाला या सोहळ्याला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह यांच्यासह भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, विश्वनाथ गुंडप्पा, रवी शास्त्री उपस्थित होते.

 54वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

वाराणसीतील राजतलाब येथील गंजरी येथे बांधण्यात येणारे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम अंदाजे 450 कोटी रुपये खर्चून 30 एकरांपेक्षा जास्त जागेत विकसित केले जाणार आहे. हे स्टेडियम देशातील 54वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ठरले आहे. आत्तापर्यंत भारतात 53 वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश स्टेडियम आता बंद झाले असून काहींचे नूतनीकरण सुरू आहे.

'क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काशीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. हे स्टेडियम केवळ वाराणसीच्याच नव्हे तर पूर्वांचलच्या तरुणांसाठी वरदान ठरेल. हे स्टेडियम महादेवाला समर्पित केले जाणार आहे. काशीमधील या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा खेळाडूंना फायदा होणार आहे. हे स्टेडियम पूर्वांचल प्रदेशातील अनेकांना स्टार बनवेल. आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे. क्रिकेट खेळण्यासाठी जगातील नवनवीन देश पुढे येत आहेत. साहजिकच आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे जेव्हा सामने वाढतील तेव्हा नवीन स्टेडियमची गरजही वाढेल, त्यामुळे वाराणसीतील हे अत्याधुनिक स्टेडियम समन्याच्या सर्व गरजाही पूर्ण करेल. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर 30,000 हून अधिक लोक येथे बसून सामना पाहू शकतील. त्याच्या उभारणीत बीसीसीआयचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे. येथील खासदार असल्याने मी बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.'

भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च प्रस्तावित

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकाम आणि भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. याच्या व्यतिरिक्त स्टेडियमच्या बांधकामासाठी बीसीसीआय 330 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे उत्तरप्रदेश राज्याला तिसरे स्टेडियम मिळेल. याआधी कानपूर येथील ग्रीन पार्क आणि लखनऊचे अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news