वंचितला अजून पाठिंबा दिलेला नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला

वंचितला अजून पाठिंबा दिलेला नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू," असे स्पष्ट करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.  प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंब्याचा केलेला दावा फेटाळला आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील 'वंचित'च्या ८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२७) जाहीर केली. 'वंचित'ने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांचा हा दावा जरांगे पाटील यांनी फेटाळला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराला अद्याप पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले. मराठा समाजासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही. सगळ्यांशी विचारविनीमय करून भूमिका घेऊ. सरकारने अजून मराठा आरक्षणाचा ठाम निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली. ३० मार्चपर्यंत समाजाचा निरोप येईल त्यानंतर निर्णय जाहीर करू, तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही, असं त्यांना सांगितलं आहे. त्यानंतरच आमचा उमेदवार ठरणार आहे. सरकारनेच मला राजकारण शिकवलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराला अजून पाठिंबा दिलेला नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

जरांगे पुढे म्हणाले की, वंचितला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झालेली नाही. मराठा समाजाचा निर्णय 30 मार्चला येणार आहे. त्या आधीच त्यांना पाठिंबा देऊन मी समाजाला फसवू शकत नाही. वंचितने ९ ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. मग त्या जागा वगळून तुमचे उमेदवार देणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, ते योग्य वेळी ठरवू. राजकारणाचे आणि समाजकारणाचे अंग वेगळे असते. समाजकारणात एक मत लागते, परंतु राजकारणात बहुमत लागते. समाजाने होकार दिला, तर मोठी उलथापालथ आम्ही घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जर समाजाने राजकीय भूमिका घेण्याचे ठरवले, तसा निर्णय ३० तारखेला झाला. तर तसे महाराष्ट्रात मोठे फेरबदल का होऊ नयेत. तसेच मोठ्या घडामोडी सध्याही राज्यात सुरू आहेत, असेही ते म्हणाले. आमच्या समाजाची ताकद गौण समजली जात होती. तिची दखल घेतली जात नव्हती. काही असंतुष्ट लोकांना पत्रकार परिषद घेऊन आरोप करायला लावायचे, ही जी पोरकटपणाचे चाळे सरकार करत आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची लाट उसळली आहे.

आपली राजकीय भूमिका ही भाजपला पोषक आहे, अशी टीका केली जात आहे. यावर ते म्हणाले की, भाजपच्या आयटी सेलच्या वतीने तशी फेकाफेकी सुरू आहे. तसेच संभ्रम तयार केला जात आहे. तसा कोणताही प्रकार घडणार नाही. सत्य पाहिले तर मराठा समाज हा गेल्या दहा वर्षात भाजपकडे झुकलेला आहे. मात्र, आता मराठ्यांनी ठरवलं आहे की, आता आपण आपली शक्ती दाखवली पाहिजे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news