व्हॅलेंटाईन डे विशेष : दैवे सांधिले जीवात्मे सारे, प्रेमस्नेहाच्या वातीने!

व्हॅलेंटाईन डे विशेष : दैवे सांधिले जीवात्मे सारे, प्रेमस्नेहाच्या वातीने!

कोल्हापूर, सुनील कदम : (व्हॅलेंटाईन डे विशेष)

गर्भापासून प्राणीमात्रा
प्रेम लाभतसे मातेचे,
अन् चराचरा अंतिम
आलिंगन त्या भूमातेचे!
जगती येता जीवात्मा
तो सुरू होतो प्रेमसोहळा,
कुणी नसे अलिप्त यातूनी
मनुष्य, प्राणी वा द्विज आगळा!
दैवे सांधिले जीवात्मे सारे प्रेमस्नेहाच्या वातीने,
भेद न जाई या प्रेमाला
कुणा जातीने वा पातीने!

या कवितेत म्हटल्याप्रमाणे अवघ्या विश्वालाच प्रेमस्नेहाच्या धाग्याने गवसणी घातलेली आहे. प्रेम ही केवळ तरुणाईची किंबहुना केवळ माणसांचीही मक्तेदारी नाही, तर जगाच्या पाठीवर माणसांसह जेवढे म्हणून जीव-जंतू आहेत, त्या सगळ्यांमध्येच प्रेमभाव आढळून येतोच. माणसाने आपल्यातील काही अजरामर प्रेमकथा लिहून ठेवलेल्या आहेत, कानोकानी चिरंतन करून ठेवल्या आहेत. पण अशाच अजरामर, उत्कट आणि चिरंतन कथा पशू-पक्ष्यांमध्येही आढळून येतात. एवढेच कशाला; माणूस आणि प्राणी, माणूस आणि पक्षी यांच्यातील प्रेमाच्याही अनेक अजरामर कहाण्या आहेत. कारण निसर्गाने मुळातच माणूस आणि पशू-पक्ष्यांमधील परस्पर नात्यांची गुंफणच प्रेमाच्या धाग्याने केलेली आहे. माणसांसारखेच पशू-पक्ष्यांचेही एक आगळे आणि तितकेच उत्कट प्रेमविश्व असल्याचे बघायला मिळते.

शहामृगाचे अमर प्रेम!

दक्षिण आफ्रिकेत आढळून येणार्‍या शहामृग पक्ष्याचे नाव आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्यातील अमर प्रेमाची कहाणी आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. शहामृगाची नर-मादी जोडी एकदा बनली की ती आयुष्यभरासाठी एकनिष्ठ असते. उभ्या आयुष्यात ही जोडी दुसर्‍या जोडीदाराचा विचारही करू शकत नाही. शहामृगाचे आयुष्य हे साधारणत: 50 ते 75 वर्षांचे असते. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत शहामृगाची जोडी आयुष्यभर परस्परांशी एकनिष्ठ राहते. शहामृगातील अमर प्रेमाची ओळख तर त्यांच्या अंतिमसमयी पटते. काही कारणांनी शहामृगाच्या जोडीतील एका शहामृगाचा मृत्यू झाला तर दुसरा शहामृग त्या क्षणापासून अन्न-पाण्याचा त्याग करून थोड्याच दिवसांत आपले आयुष्य संपवून टाकतो. शहामृगातील हे अमर प्रेम कधी कधी माणसांमध्येही बघायला मिळते.

महाराणा प्रताप आणि चेतक!

जसा माणूस परस्परांना जीव लावतो, तसाच अनेकवेळा माणूस एखाद्या प्राण्याला आणि एखादा प्राणी माणसाला जीव लावताना आणि परस्परांसाठी जीव देताना दिसतात. हेदेखील उत्कट प्रेमाचेच निशाण समजायला पाहिजे. राजस्थानातील मेवाडचा महाराणा प्रताप आणि त्यांच्या चेतक नावाच्या घोड्याची कहाणी ही एका जनावराने आपल्या धन्यावर केलेल्या परमोत्कट प्रेमाचे प्रतीक आहे. सम्राट अकबराबरोबर झालेल्या हळदी घाटच्या लढाईत महाराणा प्रताप आणि चेतक घोडासुद्धा प्रचंड जायबंदी झाले होते. पण स्वत: जखमी असतानाही चेतकने जीवतोड घोडदौड करीत महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी पोहोचविल्यानंतरच आपले प्राण सोडले होते. माणूस आणि प्राण्यातील अस्सल प्रेमाचीच ही निशाणी आहे. बैल, गाय, कुत्रा आणि माणसातील अमर प्रेमाची अशीच उदाहरणे आपल्या आजूबाजूलाही दिसून येतात.

प्रेम तरुणाईची मक्तेदारी नव्हे ! (व्हॅलेंटाईन डे विशेष)

प्रेम म्हणजे केवळ तरुणाईची मक्तेदारी समजायचेही काही कारण नाही. माणसांच्या खर्‍याखुर्‍या आयुष्यातही अनेक शहामृगांच्या जोड्या आढळून येतात. उतारवयाकडे झुकता झुकता पती-पत्नीमधील प्रेम आणखीनच फुलतानाची अनेक उदाहरणे कोणत्याही शहरातील नाना-नानी पार्कमध्ये बघायला मिळतील. तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत आयुष्यातील अनेक टक्केटोणपे खात, अनेक चढउतार बघितलेली जोडपी आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या जोडीदाराची विशेष काळजी घेताना दिसतात. शेवट गोड व्हावा यासाठी परस्परांना आधार देत वाटचाल करणारी ही जोडपी बघितल्यानंतर शहामृगाच्या जोडीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

प्रेमरंगी विश्वची रंगले!

प्रेम म्हणजे जशी तरुणाईची मक्तेदारी नाही, तशीच ती कोणा एका नात्याचीही मक्तेदारी नाही. केवळ हीर-रांझा, लैला-मजनू, सिरी-फरहाद, सोनी-महिवाल किंवा युवा जोड्या यांचे प्रेम म्हणजे खरे प्रेम असेही काही नाही. आईचे आपल्या लेकरावर जन्मभर प्रेम असतेच; पण लेकराचा पितासुद्धा आपल्या लेकरावर तेवढंच प्रेम करीत असतो. पण ते तो दिसू देत नाही. बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ, आजी-आजोबा-नातवंडे, काका-काकी, मामा-मामी, मावशी, आत्या असे मानवी प्रेमाचे अनेक पदर जसे माणसांमध्ये दिसतात, तसेच ते पशू-पक्ष्यांमध्येही दिसून येतात. 'माय मरो पण मावशी मरो'सारखे दाखले पशू-पक्ष्यांमध्येही दिसून येतात. पोरकं झालेल्या आपल्या कळपातील एखाद्याचा सांभाळ पशू-पक्षीही करतात.

प्रेमाला करुणेची झालर!

अनेकवेळा आपण वाचतो किंवा ऐकतो की, स्वत:च्या मुलासह मातेची आत्महत्या, मुलांसह माता-पित्याची आत्महत्या!… पाहणार्‍याला यातील क्रूरता दिसेल; पण त्याच्या पाठीमागील प्रेमाची भावनाही समजून घ्यायला हवी. आपल्या पश्चात आपल्या लेकरा-बाळांना आपल्याप्रमाणे कुणी सांभाळणार नाही, कुणी प्रेम करणार नाही, या आशंकेने उचललेले ते शेवटचे पाऊल असते. या जीव घेण्यामागेही लागलेला जीव हेच कारण आणि त्याला एक करुणेची झालर दिसते. जीव लावणारे, प्रसंगी जीव देणारे आणि वेळप्रसंगी जीव घेणारे असे प्रेमाचे नानाविध रंग या जीवसृष्टीत पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news