“सर्किट” चित्रपटातून मधुर भांडारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!!

मधूर भांडारकर
मधूर भांडारकर

पुढारी ऑनलाईन डेस्क – "चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीमध्ये पदार्पण करत आहेत. आकाश पेंढारकर दिग्दर्शित 'सर्किट' या चित्रपटाची प्रस्तुती मधुर भांडारकर करत असून, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत . येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर हा गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. "सर्किट" या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत. वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.अभिनेता रमेश परदेशी याची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे.

रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ "सर्किट" या चित्रपटात झाल्याचं आपल्याला टीजरमध्ये पाहता येतं. चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांची आहे.

मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीबाबत निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणाले, की गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी जवळून पाहिली आहे. मी हिंदी चित्रपटात कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाची निर्मिती-प्रस्तुती करण्याची इच्छा होती. ती संधी मला "सर्किट" या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news