शिवरायांची वाघनखे मेमध्ये सातार्‍यात येणार

शिवरायांची वाघनखे मेमध्ये सातार्‍यात येणार

सातारा :  हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखं 3 वर्षे देशात राहणार असून, पहिल्यांदा सातार्‍यात येणार आहेत. दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मे महिन्यात ही वाघनखं सातार्‍यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती वर्षभर ठेवण्यात येणार आहेत. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी वाघनखं सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार असून, त्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या वतीने वेगाने तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत तमाम सातारकरांना पाहता येणार आहेत. याबाबत मुंबई जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती तर सातारा, कोल्हापूर व नागपूर येथील जिल्हाधिकारी यांच्या अध्क्षतेखाली सहाजणांची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाने अध्यादेश काढला आहे.

दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मे महिन्यात ही वाघनखं सातार्‍यात येणार आहे. त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 'शिवशस्त्रशौर्य' असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित तलवार व वाघनखे ही इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली होती. त्यामधील भवानी तलवार सेंट जेम्स पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनचा भाग आहे. आणि वाघनखं (वाघांचे पंजे) इंग्लंडमधील व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या संग्रहाचा भाग आहेत.

व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम या संग्रहालयात या वाघनख्यांची Tiger claws said to have been possessed by shivaji अशी नोंद आहे. वाघनखे या म्युझियममध्ये तळघरातील एका कपाटात ठेवली आहेत. त्यासाठी एक खास पेटी आहे. ती बघण्यासाठी परवानगीची आवश्यता आहे. ही वाघनखं सर्वसामान्यांना पाहता यावीत, यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताला देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती दिली आहे. ही वाघनखं महाराष्ट्रातील तीन संग्रहालयांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालय, कोल्हापूर येथेही लक्ष्मी-विलास पॅलेस तर नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात प्रत्येकी एक वर्षे ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत. ही वाघनखं प्रदर्शित करणे, त्याची सुरक्षा तसेच त्याचा प्रवास हा अतिशय जोखमीचा व जबाबदारीचा आहे. प्रदर्शनाच्या अनुषंगाने प्रदर्शनाची व्यवस्था, सुरक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठित करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात वाघनखं व इतर वस्तुंसाठी गॅलरी बनवण्याचे काम सुरु आहे. यातील फर्निचरचे काम वेगाने सुरु असून वाघनखं प्रदर्शनासाठी शिवाजी संग्रहालय प्रशासन सज्ज झाले आहे.

अशी आहे वाघनखाची रचना

वाघनखं उत्कृष्ट पोलादापासून बनवली असून, अतिशय प्रमाणबद्ध आहेत. एक पट्टी त्यावर खालच्या बाजूस बसवलेल्या चार नख्या आणि वरच्या बाजूस अंगठा असे या वाघनखाचे स्वरूप आहे. ही वाघनखं डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत, तर मोठी अंगठी तर्जनींच्या बोटात जाते मग चार नखे चार बोटांच्या बरोबर खाली येतात अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र आहे.

सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात वर्षभर ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. ही वाघनखे ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. संग्रहालयातील अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात आली असून, सातारकरांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
-प्रवीण शिंदे, अभिरक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news