पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा आणि दंडलगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग रविवारी कोसळला. यामध्ये ४० कामगार अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान रात्री उशिरा ड्रिलिंग सुरू असताना ड्रिलिंग मशिनमध्ये बिघाड झाल्याने बचावकार्य थांबवावे लागले. त्यानंतर येथील बचावकार्यासाठी अमेरिकन ड्रिल मशीन मागविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarakhand Tunnel)
काम सुरू असलेल्या बोगद्यात गेल्या चार दिवसांपासून ४० कामगार अडकले असून, ते अजूनही जीवाशी लढत आहेत. हवाई दलाच्या विमानाने दिल्लीहून आणलेले अमेरिकन ड्रिलिंग मशीन बोगद्यात बसवण्यात आले आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या आत उच्च शक्तीचे अमेरिकन ऑजर मशीन बसवण्यात आले आहे. खोदकामाचे काम लवकरच सुरू होणार आहे. दुसरीकडे, सिल्क्यरा बोगद्यातील मलबा हटवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, असेही संबंधित बचाव पथकाने स्पष्ट केले आहे. (Uttarakhand Tunnel)
बचाव कार्यात वापरण्यात येणाऱ्या या अवाढव्य यंत्रांना दोन हर्क्युलस C-130 विमानांमधून उत्तरकाशीला आणण्यात आले. अमेरिकेतून आणण्यात आलेले हे ड्रील मशिन तीन भागात होते. ते एकत्र करून काम सुरू केले जात आहे. अशा परिस्थितीत कामगारांना बाहेर काढण्याच्या दुसऱ्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून डेहराडून येथून एक मीटर जाडीचे स्टीलचे पाइप आणण्यात आले. (Uttarakhand Tunnel)
NHIDC संचालक अंशू मनीष यांनी सांगितले की, कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी 50 तास लागू शकतात. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकी टॉकीजच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. ऑक्सिजन, पाणी, औषधे आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा पाईपद्वारे सातत्याने केला जात असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarakhand Tunnel)