Uttarakhand Tunnel Rescue : पाझरणारे पाणी, चिरमुर्‍यांवर जगलो; मजुरांचे शहारा आणणारे अनुभव

Uttarakhand Tunnel Rescue : पाझरणारे पाणी, चिरमुर्‍यांवर जगलो; मजुरांचे शहारा आणणारे अनुभव
Published on
Updated on

उत्तर काशी; वृत्तसंस्था : सियालक्यारा बोगद्याचे काम सुरू असतानाच अचानक काही भाग कोसळला. बोगद्यामध्ये एक मोठा आवाज घुमला. आम्हाला काहीच कळेना. बोगद्यात गाडले जात असल्याची भीती निर्माण झाली. सुरुवातीला भानच राहिले नव्हते. बोगद्यात अडकल्याने जगण्याची खात्री नव्हती. बोगद्याच्या छतामधून गळणारे आणि कडांमधून झिरपणारे पाणी पिऊन काही दिवस काढले. त्यानंतर दहा दिवसांपर्यंत चिरमुर्‍यांवर पोट भरून कसेबसे दिवस काढले, असे भयावह चित्र बोगद्यातून बचावलेल्या एका मजुराने चितारले. (Uttarakhand Tunnel Rescue)

झारखंडमधील अनिल बेदिया असे या मुजराचे नाव असून, त्याच्यावर उत्तराखंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषीकेशमधील एम्स रुग्णालयात सर्व 41 मजुरांना दाखल करण्यापूर्वी या मजुराने बोगद्यातील थरारक अनुभव फोनवरून कथन केला. अनिल यांनी सांगितल्यानुसार, बोगद्यात अडकल्यानंतर जिवंत सुटका होईल, याची खात्री वाटत नव्हती. तरीही आम्ही सर्वांनी धीर सोडला नव्हता. फावल्या वेळेत आम्ही बोगद्यात योगा आणि खूप वेळ चालण्यामध्ये घालवला. भूक लागल्यानंतर चिरुमुरे खात होतो. बोगद्याच्या छतातून टपकणारे आणि बोगद्याच्या भिंतीतून पाझरणारे पाणी चाटून तहान भागविण्याचे काम केले. त्यानंतर बचावकार्यातील पथकाने तब्बल 70 तासांनंतर आमच्याशी संपर्क साधला. बचाव पथकाकडून दहा दिवसांनंतर आम्हाला अन्न, फळे आणि बाटलीतून पाण्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. आमच्यात जगण्याची आशा पल्लवित झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सबाह अहमदशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी मजुरांशी फोनवरून बोलले. बोगद्यात 17 दिवस अडकून असलेले युवा अभियंता सबाह अहमद यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम संवाद साधला… तो असा…

पंतप्रधान मोदी : शाब्बास सबाह, 17 दिवस एक मोठा काळ असतो. तुम्ही जी हिंमत दाखविली. एकमेकांचा उत्साह वाढविला. धीर सोडला नाही. अभिमानास्पद! अप्रत्यक्ष का असेना, मी तुमच्यासह होतो. माझाही जीव अडकलेला होता. मी सतत अपडेट घेत होतो. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी तुमची सुटका सत्वर व्हावी म्हणून सातत्याने बोलत होतो.
सबाह अहमद : सर, आम्हाला जाणीव आहे. सगळेच आमच्यासोबत होते. यातूनच आम्ही खचलो नाही. कधी भ्यायलोही नाही. सगळे मजूर वेगवेगळ्या राज्यांचे होते सर; पण खरे तर 17 दिवस बोगद्यात एक भारत
अवतरलेला होता. आम्ही सख्ख्या भावांप्रमाणे राहिलो. जे काही खायला येत होते, ते आम्ही सारखेच वाटून खात होतो.
पंतप्रधान मोदी : तुम्ही योगासनेही करत होता, असे मी ऐकले.
सबाह अहमद : हो सर, आम्ही दररोज सकाळी योगा करत होतो. खाण्यापिण्याशिवाय दुसरे काम नव्हते. योगाने आम्हाला मोठे बळ दिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news