पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडच्या सिल्क्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून बचावकार्य सुरुच आहे. आतापर्यंत केवळ २४ मीटरपर्यंत पाइप ढिगाऱ्यात पोहोचली आहे. काल शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान बचावकार्य ठप्प झाले. कारण ड्रिलिंग दरम्यान हादऱ्याने बचावपथकाच्या दिशेने आणखी ढिगारा कोसळला. ड्रिलिंगसाठी अमेरिकेचे ऑगर मशीनमध्येही तांत्रिक बिघाड झाला. मशीनचे बेयरिंग खराब झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. (Uttarakhand tunnel crash)
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाईपद्वारे आत अडकलेल्या कामगारांशी संवाद साधला जात आहे. तसेच त्यांना त्याद्वारे ड्रायफ्रुट्स आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, रविवारी उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर १५० तासांहून अधिक वेळ बोगद्यात अडकलेल्या पुष्कर या कामगाराशी त्याचा भाऊ विक्रम सिंह याने संवाद साधला. तेव्हा त्याने पहिल्यांदा सांगितले की "भाई, आईला तू सांगू नकोस की मी इथे अडकलो आहे."
संबंधित बातम्या
२५ वर्षीय बांधकाम कामगाराचा बोलताना आवाज खूपच कमजोर होता. कारण त्याने हवेशिवाय, अंधारात सात दिवस घालवले आहेत. "मी ठीक आहे. येथे इतरजणही आहेत… तू खरं काय घडलंय ते सांगशील तर आई काळजी करेल." असेही पुष्करने त्याच्या भावाशी बोलताना सांगितले.
चंपावत जिल्ह्यातील छनी गोठ गावात राहणाऱ्या विक्रमला त्याच्या भावाशी बोलल्यावर अश्रू अनावर झाले. "शुक्रवारी मला त्याच्याशी थोडावेळ बोलण्याची संधी मिळाली. त्याला याची काळजी आहे की आपल्या आईला याचा त्रास होणार नाही."
तो म्हणाला, "आमच्याकडे बोलण्यासाठी फक्त काही सेकंद होते. म्हणून मी पटकन त्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि बाहेर सुरु असलेल्या बचावकार्याबद्दल माहिती दिली…तो लहान असल्याने आईसाठी तो खूप प्रिय आहे."
विक्रम हा उत्तराखंड रोडवेजमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. त्याला बातमी ऐकून या घटनेची माहिती मिळाली. तो आई-वडिलांना या दुर्घटनेबद्दल काहीही न सांगता लगेचच उत्तरकाशीला आला. मात्र शेजाऱ्यांकडून आई-वडिलाना याबाबत कळाले. तो म्हणाला, की "त्यांना याचा मोठा धक्का बसला आहे."
बचावकार्यात गुंतलेले लोक आत अडकलेल्या ४१ कामगारांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधत आहेत. बोगद्याच्या ठिकाणी वेल्डिंगचे काम करत असलेले मोहम्मद रिझवान सांगतात की, "आम्ही तिथेच आहोत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत. पण या सर्वांचा एकच प्रश्न आहे, 'तुम्ही आम्हाला येथून बाहेर कधी काढणार?.' "
आधी ४० कामगार बोगद्यात अडकले असल्याची माहिती समोर आली होती. पण आता आत ४१ कामगार अडकले असल्याची पुष्टी झाली आहे. (Uttarakhand tunnel crash)