पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड विधानसभेत बहुप्रतिक्षित समान नागरी संहिता विधेयक उद्या ( दि. ६) मांडण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. या विधेयकासाठी उत्तराखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन बाेलविण्यात आले आहे.
आज माध्यमांशी बोलताना धामी म्हणाले की, . प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. विधानसभेत बहुप्रतिक्षित समान नागरी संहिता विधेयक उद्या मांडण्यात येईल. सर्व प्रक्रिया आणि वादविवाद होतील. संपूर्ण देश उत्तराखंडकडे पाहत आहे. मी सर्वांना विनंती करतो की चर्चेत आशावादीपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनाचा कालावधी ५ ते ८ फेब्रुवारी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या दृष्टीने रविवारी विधानसभा भवनातील सभागृहात विधानसभा अध्यक्षा रितू खंडुरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. अधिवेशन सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.