आदरांजली : मंत्रमुग्ध स्वरयात्री

आदरांजली : मंत्रमुग्ध स्वरयात्री
Published on
Updated on

उस्ताद राशिद खान हे हिंदुस्थानी संगीत परंपरेतील एक महान गायक होते. संगीताचा लाभलेला वारसा, काळजाला भिडणारा आवाज आणि जन्मजात प्रतिभा यांच्या साहाय्याने राशिद खान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील समकालीन आघाडीच्या गायकांपैकी एक बनले. 'अलबेलो सजन आयो रे' आणि 'आओगे जब तुम हो सजना' या त्यांच्या गाण्यांनी तरुणपिढी अक्षरशः घायाळ झाली. अवीटता या शब्दामध्ये किती ओतप्रोत अर्थ भरलेला आहे, याची प्रचिती राशिद खान यांच्या गाण्यांमधून येते.

भारतीय गानसंगीताच्या परंपरेला प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील काही घराण्यांनी या क्षेत्रात आपला अवीट ठसा उमटवला आहे. आपापल्या घराण्याची गायकी पुढे नेताना त्या चौकटीपलीकडचा स्वरावकाश शोधण्याचे भान ज्या मोजक्या गायकांना होते, त्यात राशिद खान अग्रणी होते. उस्ताद राशिद खान हे हिंदुस्थानी गायनाच्या रामपूर-सहस्वान घराण्याचे एक प्रमुख गायक होते. त्यांनी त्यांचे ग्वाल्हेरचे काका उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि घराण्याचे खलिफा (प्रमुख) उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. संगीताचा लाभलेला वारसा, काळजाला भिडणारा आवाज आणि जन्मजात प्रतिभा यांच्या साहाय्याने राशिद खान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील समकालीन आघाडीच्या गायकांपैकी एक बनले.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी एकदा राशिद खान यांची बंदीश ऐकून असे म्हटले होते, की राशिद खानच्या हातात हिंदुस्थानी संगीताचे भविष्य सुरक्षित आहे. भीमसेनजींच्या या प्रशंसेमधून राशिद खान यांच्या सुरांची मोहिनी किती प्रभावी होती, हे लक्षात येते. राग मुलतानीमधील प्रसिद्ध द्रुत ख्यालमधील त्यांचे तेजस्वी गायन 'नैनन में आन बंद', 'कौनसी परी रे' यांसारख्या गाण्यांमुळे उस्ताद राशिद खान हे महान गायक म्हणून स्मरणात राहतील.

राशिद खान यांनी ख्यालबरोबरच ठुमरीमध्यही उत्कृष्ट सादरीकरण करून आपल्यातील चतुरस्रता दाखवून दिली. कोणत्याही गायकाने सादर केलेल्या गाण्याचे मूल्यमापन ते गाणे रसिकांच्या मनात किती काळ घर करून राहते, ते सातत्याने गुणगुणले जाते का, यावरून केले जाते. या निकषावर राशिद खान यांच्या गायनाकडे पाहिले असता, त्यांचे कोणतेही सादरीकरण आपण एकदा ऐकले की विसरूच शकणार नाही, असे होते.

राशिद खान यांना त्यांचे काका पहिल्यांदा मुंबईला घेऊन गेले. तेथे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. नंतरच्या काळात उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी ते कोलकात्यात आयटीसी म्युझिक रिसर्च अकादमीमध्ये दाखल झाले. 'तराना गायना'मध्ये पारंगत मानले जाणारे उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी गायनाचे बारकावे शिकले होते. शास्त्रीय गायनाच्या मैफिलींमध्ये राशिद खान जेव्हा सूर छेडत, तेव्हा समोर उपस्थित असणारे श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होत असत.

लाखो संगीतरसिकांचे प्रेम लाभलेल्या राशिद खान यांना सुरुवातीच्या काळात संगीतात फारसा रस नव्हता, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र, त्यांना सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये रस होता आणि त्यांना गायक नव्हे तर क्रिकेटर व्हायचे होते, ही वस्तुस्थिती आहे. पण ते त्यांच्या घराण्याच्या परंपरांपासून फार काळ दूर राहू शकले नाहीत आणि हळूहळू त्यांची संगीताची आवड वाढू लागली. एकरुपता, तल्लीनता, समर्पण भाव आणि त्याला लाभलेली सरावाची जोड याद्वारे त्यांनी संगीताच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बडे गुलाम अली खाँसाहेबांनी गायलेल्या 'याद पिया की आए…' या गीताने अनेक गायकांना आव्हान दिले. मात्र, राशिद खान यांनी गायलेले रूप अनेकांना खाँसाहेबांच्या मूळ गायकीच्या जवळचे वाटले.

गानसंगीताच्या चाहत्यांमध्ये दोन प्रमुख वर्ग आहेत. एक गट शास्त्रीय संगीताचा चाहता आहे; तर दुसरा गट शास्त्रीयेतर म्हणजे सिनेसंंगीताचा, भावगीतांचा चाहता आहे. तरुणपिढीमध्ये शास्त्रीय गायनाबाबत फारशी रुची दिसत नसली, तरी राशिद खान त्यांच्या परिचायचे आहेत. याचे कारण 'हम दिल दे चुके सनम'मधील 'अलबेलो सजन आयो रे' आणि 'जब वुई मेट'मधील 'आओगे जब तुम हो सजना' या गाण्यांनी तरुणपिढी अक्षरशः घायाळ झाली. रेडिओ, कॅसेट, टीव्ही, सीडी, वॉकमन, मोबाईल आदी सर्व माध्यमांमधून या गाण्याची अक्षरशः पारायणे झाली. पण आजही ही गाणी कानावर पडली, की मन शांतपणाने त्यात तल्लीन होऊन जाते. अवीटता या शब्दामध्ये किती ओतप्रोत भरलेला अर्थ आहे, याची प्रचिती राशिद खान यांच्यासारख्या महान गायकाने गायलेल्या या गाण्यांमधून येते.

कॅसेटच्या जमान्यामध्ये राशिदभाईंच्या मैफिलींच्या, स्वतंत्र गाण्याच्या, रागसंगीताच्या कॅसेटस्ना मोठी मागणी असायची. पुण्यामध्ये पार पडणार्‍या 'सवाई गंधर्व महोत्सवा'सह विविध संगीत महोत्सव त्यांच्या दमदार, कसदार गायकीने अंतर्बाह्य बहरून गेलेले रसिक त्यांच्या निधनाच्या वार्तेने मनापासून हळहळले. तीन वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा चरित्रात्मक मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. या चित्रपटात राशिद खान यांनी गायलेला मारवा ऐकताना देहभान विसरायला होते. श्रोत्यांना डोळे मिटून एका वेगळ्या विश्वात नेण्याचे अद्भुत सामर्थ्य राशिद खान यांच्या जादूई आवाजात आणि हरकतींमध्ये होते.

उस्ताद राशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खाँ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. त्यांच्या गाणे म्हणण्याच्या शैलीत हा प्रभाव जाणवत असे. एका मुलाखतीत त्यांनी भीमसेनजींची खास आठवण सांगितली होती. मला साक्षात पंडितजींसह गाणं म्हणायची संधी मिळाली. आमची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. ही जुगलबंदी झाल्यानंतर पंडितजींनी माझं कौतुक केलं होतं. तसेच सातार्‍याहून माझ्यासाठी खास विड्याची पाने ते पाठवायचे. 'माय नेम इज खान' या चित्रपटातील 'अल्लाह ही रहेम', यासह 'शादी मे जरूर आना' या चित्रपटात 'तू बन जा गली संग' अशी गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news