Coco Gauff US Open Champion: 19 वर्षीय कोको गॉफ बनली ‘यूएस ओपन’ची चॅम्पियन!

Coco Gauff US Open Champion: 19 वर्षीय कोको गॉफ बनली ‘यूएस ओपन’ची चॅम्पियन!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Coco Gauff US Open Champion : अमेरिकेची 19 वर्षीय युवा टेनिसपटू कोको गॉफ हिने बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिचा पराभव करून यूएस ओपन 2023 च्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. कोकोचे कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. अंतिम फेरीत तिने साबालेंकाचा 2-6, 6-3, 6-2 अशा फरकाने पराभव केला. याचबरोबर तिने सलग 12 व्या सामन्यात विजयाला गवसणी घातली आहे. 2022 मध्ये कोकोला फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

कोकोचे जबरदस्त पुनरागमन

न्यूयॉर्कच्या आर्थर अॅशे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकन खेळाडू कोकोने उत्कृष्ट पुनरागमन करत 1-3 अशी सुरुवातीची आघाडी घेतली आणि नंतर हा सेट 3-6 असा जिंकला. अशा स्थितीत सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटपर्यंत पोहोचला. 0-4 ने पिछाडीवर पडल्यानंतर सबालेन्काने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि स्कोअर 2-4 असा केला. पण कोकोने पुन्हा मुसंडी मारली. तिने पुढचे दोन गेम जिंकून सामना खिशात टाकला आणि यूएस ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले. (Coco Gauff US Open Champion)

अन् कोकोला आनंदाश्रू अनावर

तिसरा सेट जिंकताच कोको गॉफ आनंदाने कोर्टवर पडली. तिचा स्वत:च्या विजयावर विश्वास बसत नव्हता. यानंतर ती भावूक झाली. तिला आनंदाश्रू अनावर झाले. याचदरम्यान ती स्टँडकडे गेली आणि तिने आपल्या कुटुंबियांना मिठी मारली. यावेळी गॉफच्या आईने चॅम्पियन मुलीच्या पाठीवर थाप मारत 'तू करून दाखवलेस' असा अभिमान व्यक्त केला. (Coco Gauff US Open Champion)

24 वर्षात विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण खेळाडू

या विजयासह कोकोमे इतिहासही रचला. 1999 नंतर यूएस ओपन जिंकणारी ती पहिली किशोरवयीन खेळाडू ठरली आहे. यापूओर्वी सेरेना विल्यम्सने 1999 मध्ये अशी कामगिरी केली होती. तर 2000 नंतर यूएस ओपनचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ती चौथी अमेरिकन खेळाडू आहे. तिच्या आधी व्हीनस विल्यम्स (2000, 2001), सेरेना विल्यम्स (2002, 2008, 2012, 2013, 2014), स्लोएन स्टीव्हन्स (2017) या महिला खेळाडू चॅम्पियन बनल्या होत्या. आता या खास अमेरिकन क्लबमध्ये कोको गफचेही नाव नोंदवले गेले आहे.

'त्या' पराभवाने आजचा विजय गोड : कोको गॉफ

विजयानंतर कोको गॉफ म्हणाली, या विजेतेपदाचा माझ्यासाठी खूप मोठा अर्थ आहे. खरेतर या विजयाचे मला अजूनही आश्चर्य वाटते. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत होणे माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. पण त्या पराभवातून मी बरेच काही शिकले. ज्यामुळे आज मी युएस ओपनचा चषक उंचावण्यात यशस्वी झाले असून त्या पराभवाने माझा विजय आणखी गोड झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news