पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना फोन लावून आपली अस्वस्थता मांडली आहे. तिने या फोनच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना काय सांगितले हे जाणून घ्या… (Urmila Matondkar)
अभिनेता अवधूत गुप्ते यांचा 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रविवारच्या (दि.२) भागात सहभागी झाली होती. यावेळी उर्मिलाने अनेक विषयांवर आपली मते मांडली. त्याचबरोबर या शोचा एक भाग म्हणून एक फोन लावण्यात आला होता. तिने हा फोन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना लावला. तिने हा फोन व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. "खुपते तिथे गुप्ते" कार्यक्रमातील माझ्याकरता आयुष्यातील सर्वात अमूल्य भाग. पूजनीय सावित्रीबाई फुले यांच्याशी उत्कट संवाद" असं ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
खरतर हा फोन अशा व्यक्तीला लावणार आहे की, ज्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी फोनची गरज नाही; पण मला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. कारण या व्यक्तीशी मनापासूनचा जो एक संवाद आहे तो कदाचित वर्षानुवर्षे चाललेला आहे. जो आज मी या फोनच्या माध्यमातून करते आहे. ती व्यक्ती आहे तमाम महाराष्ट्रातील लेकीबाळींची, मुलींची, महिलांची, जननी असं म्हणता येईल किंबहुना भारतात ज्या सर्व स्त्रिया आहेत त्या सर्वांची जननी आहे. त्या सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या माननीय वंदनीय सावित्रीबाई फुले आहेत.
त्या काळामध्ये जेव्हा स्त्रिया घरामधून निघतही नव्हत्या त्या काळामध्ये आई तू घराबाहेर पडलीस. पुढे हा विचार केलास की, हे शिक्षण पुढे माझ्या प्रत्येक लेकीबाळीला पोहचवायचं आहे आणि त्यावेळी तुम्ही ते केलेत म्हणून आम्ही आज इथे आहोत. आणि ज्याप्रमाणे एका मुलीकरता सगळं काही आईच असते. जसे प्रेम आदर आई असते त्याप्रमाणे वाईट वाटलेल्या गोष्टी सांगण्याकरिता सुद्धा फक्त आईच असते. त्यामुळे या गोष्टीचं फार दु:ख आहे की जी शाळा तुम्ही जवळपास दीडएकशे वर्षापूर्वी सुरु केली. ती भिडेवाड्याची शाळा. आज अत्यंत विदारक परिस्थितीत आहे.
कारण पक्ष बदलतात, सत्ता बदलतात; पण कोणाला हा विचार आलेला नाही की, ज्या व्यक्तीने महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवला त्या भिडे वाड्यातील शाळेला आपण परत एकदा त्याची जी काही गौरवगाथा आहे. ती दाखवली पाहिजे. त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. हा विचार कोणाच्याच मनात आलेला नाही. देव करो आणि या माझ्या या फोननुसार माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचावेत.
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, "वाईट वाटणारी आणि व्यथा असणारी दुसरी गोष्ट म्हणजे की एवढं सारं शिक्षण घेऊन अनेक महिला कर्तबगार आहेत. राजकराणासारख्या क्षेत्रात आहेत. जिथे त्या सामाजिक बदल घडवू शकतात. राजकीय बदल घडवू शकतात; परंतु आजही त्यांना पुढे येऊ दिले जात नाही. मी ही स्त्री असल्यामुळे माझ्याबरोबरही भेदभाव झाल्याचे माझ्या लक्षात आले की ही स्त्री पुढे आली तर, ही जर लोकांच्यापुढे पोहोचली तर आपलं महात्म्य झाकाळून तर जाणार नाही ना, असा विचार त्यांना येतो. जेव्हा जेव्हा असा लढा द्यायचा असेल तेव्हा तेव्हा मृणाल गोरेताई असतील, अहिल्या रांगणेकर असतील, प्रमिला दंडवते असतील यांच्यासह आजच्या काळामधील अगदी मेधा पाटकरपर्यंत जेव्हा जेव्हा झगडायचं असेल, समाजाकरिता पुढे यायचं असेल, रस्ता काढायची वेळ आली तेव्हा त्या झगडल्या; पण त्यांनी ती जागा मिळाली का आई?
ज्या महाराष्ट्रानं पूर्ण देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली; पण माझ्या महाराष्ट्रात कधी पहिली महिला मुख्यमंत्री होणार? ती मोठी मोठी खाती कधी चालवणार, पोलिस क्षेत्रात मोठ्य़ा मोठ्या खात्यांवर माझ्या महिला कधी बसणार. त्यामुळे आई आज माझ एवढचं म्हणणं आहे की, तू दिलेला वारसा पुढे नेईन. आणि त्या सर्व मुलींकरता नेईन. गावामध्ये, खेड्य़ांमध्ये आणि शहरांमध्ये असलेल्या. ज्याच्यांपर्यंत या गोष्टी पोहचलेल्या नाहीत. त्यांच्या करिता मी उभी राहीन. ज्यांना आज कदाचित बोलण्याची संधी मिळत नाही. त्यांना आवाज नाही. त्यांचा आवाज बनून मी नेहमीच लढत राहीन. आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील मुलींना शैक्षणिक भागात जिथे जिथे पुढे नेता येईल तिथे तिथे तुमचा आशीर्वाद घेऊन मला ते करायला खूप खूप आवडेल. परत एकदा तुमच्या चरणी, तुमच्या उदात्तेला प्रणाम करुन फोन ठेवते."
हेही वाचा