पुण्यात शहरी गरीब योजनेला एजंटचे ग्रहण ! शहराबाहेरील व्यक्तींची बनावट कागदपत्रांच्या आधारे काढली कार्ड

पुण्यात शहरी गरीब योजनेला एजंटचे ग्रहण ! शहराबाहेरील व्यक्तींची बनावट कागदपत्रांच्या आधारे काढली कार्ड
Published on
Updated on

हिरा सरवदे

पुणे: शहरातील गरीब रुग्णांसाठी महापालिकेकडून राबविल्या जाणार्‍या शहरी गरीब योजनेला एजंटचे ग्रहण लागले आहे. योजनेचे कार्ड देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करूनही एजंटचे ग्रहण सुटताना दिसत नाही. पुण्याबाहेरील रुग्णांना महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंटकडून ठरावीक रकमेची मागणी केली जात असल्याचे काही प्रकार रुग्णालयांच्या सतर्कतेमुळे उजेडात आले आहेत.

महापालिकेने शहरातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे, अशा नागरिकांसाठी 2011 पासून शहरी गरीब योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित कुटुंबातील व्यक्तींना पॅनलवरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. तसेच कॅन्सर व किडनीसारख्या दुर्धर आजारासाठी दोन लाख रुपये मिळतात. मात्र, धनाढ्य लोकांकडून खोट्या कागदपत्रांच्या आधाराने या योजनेचे लचके तोडले जातात. ज्यांच्याकडे नियमात बसणारे कागदपत्र नसतात, एजंटकडून बनावट कागदपत्रे काढून दिली जातात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने योजनेचे कार्ड देण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. यामध्ये बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उजेडात येत आहे.

असे असले तरी या योजनेला लागलेला एजंटचा विळखा सैल होण्याचे नाव घेत नाही. ही योजना केवळ महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशांसाठी आहे. तरीही पुणे शहराबाहेरील रुग्णांनाही योजनेचे कार्ड मिळवून देण्याचा प्रताप वैद्यकीय क्षेत्राच्या नावावर काम करणार्‍या एका परिषदेच्या एजंटकडून करण्यात आला आहे. या एजंटकडून रुग्णांच्या उपचारासाठी योजनेचे पैसे मिळवून देण्याच्या बदल्यात टक्केवारीची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

चक्क सातारा जिल्ह्यातील रुग्णाला मिळाले कार्ड

सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण पुण्यातील केईएम रुग्णालयात मेंदुच्या उपचारासाठी 2 मे रोजी दाखल झाला. त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे उपचाराच्या इस्टीमेटची मागणी केली. एका परिषदेचा स्वयंसेवक महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून 2 लाख रुपये मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी 15 मे रोजीचे शहरी गरीब योजनेचे 2 लाख रुपयांचे पत्र रुग्णालयास दिले. मात्र, रुग्ण सातारा जिल्ह्यातील असल्याने ही योजना त्याला लागू होऊ शकत नाही, हे लक्षात आल्याने रुग्णालयाने महापालिकेशी संपर्क केला. दरम्यान, योजनेचा लाभ मिळण्यासाठी एजंटने 33 हजारांची मागणी केल्याचा मेल संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाने 23 मे रोजी रुग्णालयाला केला. एजंटने रुग्णाचा भवानी पेठेतील पत्ता असलेले आधार कार्ड काढल्याचेही उजेडात आले.

धाराशिवच्या रुग्णाचाही अर्ज

धाराशिव जिल्ह्यातील एक रुग्ण जहांगीर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एजंटने त्याची भवानी पेठेतील पत्त्याची कागदपत्रे तयार करून योजनेच्या कार्डसाठी महापालिकेडे अर्ज केला. त्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर परिषदेशी संबंधित व्यक्तीनेच आधार कार्ड रिसिव्ह केल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news