UPSC Result 2022 : सातारा जिल्ह्यातील चौघांचा झेंडा

UPSC Result 2022 : सातारा जिल्ह्यातील चौघांचा झेंडा
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Result 2022) वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत सातारा जिल्ह्याने चौकार लगावला. सनपाने, ता. जावली येथील ओमकार मधुकर पवार, कराड येथील रणजित यादव, सातार्‍यातील गोळीबार मैदान येथील ओमकार शिंदे, माण तालुक्यातील अमित शिंदे यांनी यूपीएससी परीक्षेत यशाचा झेंडा फडकावला असून त्यांच्यामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय सेवेची आस गप्प बसू देत नाही. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून धेयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. याचाच प्रत्यय यूपीएससी परीक्षेच्या निकालात आला. सातारा जिल्ह्यातील 4 सुपुत्रांनी अटकेपार झेंडा फडकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने नागरी सेवेसाठी 17 मार्च 2021 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे या कालावधीत झाल्या. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चौघांनी बाजी मारली. (UPSC Result 2022)

जावली तालुक्यातील सनपाने गावातील ओमकार मधुकर पवार यांनी या परीक्षेत पूर्ण देशामध्ये 194 वी रँक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ते मागील वर्षीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी त्यांची निवड आयपीएससाठी झाली होती. मात्र, प्रशासकीय अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे आयपीएस झाल्यानंतरही त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि पूर्वी एकदा आयपीएससाठी यूपीएससी परीक्षा पास झाल्याचा फायदा त्यांना यावेळी झाला. सनपाने या गावी राहूनच त्यांनी हे यश मिळवले. कराड येथील रणजित मोहन यादव यांनीही ओमकार यांच्यापाठोपाठ देशात 315वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षेत झेंडा लावला.

सातार्‍यातील गोळीबार मैदान येथील ओमकार राजेंद्र शिंदे यांनीही नेत्रदीपक यश मिळवले. ओमकार हा सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र शिंदे यांचा मुलगा तर माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांचा भाचा आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 433 वी रँक मिळवली आहे. माणसारख्या दुष्काळी तालुक्यातील भांडवली, तेलदरा येथील अमित लक्ष्मण शिंदे यांनीही यूपीएससी परीक्षेत 570 वी रँक मिळवली आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील चार युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news