गुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गुडाळ परिसरातील शेतात झोपड्या उभ्या करून राहिलेल्या पर जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांचे मोठे हाल झाले. पावसात झोपड्या बाहेर ठेवलेला लाकूड फाटा, धान्य आणि कपडे भिजल्याने मजुरांचे नुकसान झाले आहे. ( Kolhapur rain )
संबंधित बातम्या
गुडाळ ( ता. राधानगरी ) येथील पाचकोडा परिसरात माजी सरपंच संदीप पाटील यांच्या वाफ्यात हिंगोली जिल्ह्यातील कापडशिंगी गावातील कृष्णा शिंदे यांच्यासह पाच ऊसतोड कामगारांची कुटुंबे झोपड्या बांधून राहिली आहेत. हे ऊसतोड कामगार फराळे येथील ओंकार शुगर कारखान्यासाठी ऊस तोडणी करतात. सोमवारी सायंकाळी राहत्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर हे ऊस तोडणी कामगार उसाची ट्रॉली भरत होते. अचानक साडेसहाच्या दरम्यान अवकाळी पाऊस सुरू झाला.
पावसाच्या जोरदार सरीमुळे कामगारांच्या झोपड्यात पाणी शिरले. शिवाय झोपडी बाहेर ठेवलेले धान्य, लाकूड फाटा, आणि दोऱ्यावर टांगलेले अंथरून- कपडेही भिजले. सोबतच्या लहान मुलांसह पावसात भिजत घाई गडबडीने झोपडीकडे परतलेल्या ऊस तोडणी मजुर महिलांना पावसाने प्रापंचिक साहित्य भिजलेले पाहून रडू कोसळले. ओंकार शुगरने या ऊस तोडणी कामगारांना आर्थिक मदत करावी अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होत आहे. ( Kolhapur rain )