जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा व भाजपाच्या सदस्य पदाचा राजीनामा भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा व लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या कडे दिला आहे. उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन हाती शिवबंधन बांधले.
जळगावच्या राजकारणामध्ये गेल्या आठ-दहा दिवसापासून उलथापालथ सुरू आहे. जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या जागी भाजपाने माजी आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेचे तिकीट दिले. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज होते, त्यातुनच त्यांनी हा निर्णय घेतला. राजीनाम्याची एक प्रत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे पाठवली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून स्मिता वाघ व उन्मेष पाटील अशी लढत जळगावकरांना पाहायला मिळू शकते.
२०२९ मधील लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवरकर यांचा साडेचार लाख मताधिक्क्याने पराभव केला होता. २०१९ मध्ये भाजपने सुरुवातीला स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना जळगावमधून भाजपने उमेदवारी दिली होती.