पिंपरी: धनंजय मुंडे यांच्या नावाखाली पैशाची मागणी, डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ 

पिंपरी: धनंजय मुंडे यांच्या नावाखाली पैशाची मागणी, डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ 

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाकडे पैशाची मागणी करण्यात आली. तसेच, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्यांना दम देण्यात आला. या बाबत शुक्रवार ९ डिसेंबर रोजी चिखली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवदास साधू चिलवंत (४१, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या सुरक्षेसाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. तक्रारदार शिवदास हे संबंधित सुरक्षा एजन्सीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करतात. दरम्यान शुक्रवारी सकाळी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांनी फोन घेतला असता समोरून "मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतो आहे" असे सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. तसेच, तू मूळचा उस्मानाबाद येथील असल्याचे आम्हाला समजले आहे. शिवाजीनगर येथील डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणून आरोपीने शिवदास यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या बाबत चिखलीचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर यांनी तक्रारीची शहानिशा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून, कोणीतरी खोडसाळपणा केला असण्याची शक्यता वर्तवली आहे. महिला पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news