नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोबाईलच्या माध्यमांतून होणाऱ्या गैरप्रकारातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी (केव्हायसी) फॉर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या निर्णयामुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. (Unknown Number)
नव्या निर्णयानुसार, आता यापुढे फोनवर आपल्याला 'Unknown' नंबर दिसणार नाही. तर फोन करणाऱ्याचे नाव दिसेल. सरकारचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आता नागरिकांना कोणत्याही ॲपशिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आपल्या मोबाईलवर येईल, ज्यामुळे कॉल उचलणारी व्यक्तीदेखील काय किंवा कसे बोलावे याबाबत सावध होईल. (Unknown Number)
दरम्यान, आजकाल सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. फ्रॉड कॉल करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची अनेक प्रकरणे वारंवार समोर येत असतात. अशात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (Unknown Number)