मुळशीत महायुतीत नेत्यांचे मनोमिलन आवश्यक

पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार
पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार

पौड : मुळशी तालुक्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा मोठा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या तीनही पक्षांत अनेक नेते आहेत, यातील काही नेत्यांचे गावपातळीवर असलेले राजकारण तालुकापातळीवरील एकजुटीसाठी धोकादायक ठरत आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये मनोमिलन होणे गरजेचे आहे. मुळशी तालुका हा विधानसभेला भोर विधानसभा मतदारसंघात येतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुळशी तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले असून, त्यांनी अनेक गावे, पूर्व भागातील मोठ्या लोकसंख्येच्या सोसायट्या या भागात दौरेही पूर्ण केलेले आहे.

भोर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांची भोर-वेल्हा-मुळशी या तीनही तालुक्यात मोठी ताकद तयार आहे. मुळशी तालुक्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) , शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) असे सहाही पक्ष निवडणूकीच्या जोरदार तयारीत आहेत. आरपीआय, वंचित आणि मनसेही आपली ताकद दाखविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मुळशी तालुक्यात गावपातळीवरील कार्यकर्ते,काँग्रेस कडे युवक वर्ग तर शिवसेना ( उबाठा गट )कडे निष्ठावान कार्यकर्तेची संख्या मोठी आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,सविता दगडे,शिवसेनेचे ( उबाठा गट) जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर,सचिन खैरे, अविनाश बलकवडे, स्वाती ढमाले तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडे यांनी योग्य नियोजन केल्यास खासदार सुप्रिया सुळे या मुळशी तालुक्यात आघाडीवर राहतील अशी चिन्हे आहेत.

भाजपचे माजी आमदार शरद ढमाले, भाजपाचे विधानसभा प्रचारप्रमुख किरण दगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, तालुका प्रमुख दीपक करंजावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे हे महायुतीच्या उमेदवाराची धुरा संभाळणार आहेत. मुळशीत खासदार सुप्रिया सुळे यांना काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा गट) फायदेशीर ठरणार आहे.तर महायुतीचा उमेदवार अंतिम झाल्यानंतर महायुतीही मुळशी तालुक्यात जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे.यामुळे मुळशीत लोकसभेला महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.मुळशी तालुक्याच्या मोठ्या गावात भाजपानेही आपले पाय रोवण्यास सुरूवात केलेली आहे. अनेक मोठ्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू आहे.तर अनेक जणांनी इतर पक्षातून भाजपात प्रवेश केलेला असून भाजपाही आता मुळशीत मजबूत झालेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news