फुरसुंगी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभ म्हटले की कन्यादान, मानपान, आहेर या सर्व गोष्टी आल्याच! ग्रामीण भागात अद्यापही या प्रथा, परंपरा आपले पाय घट्ट रोवून आहेत. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत फुरसुंगी येथील हरपळे या शेतकरी कुटुंबाने अनावश्यक चालीरितींना फाटा देत लग्नात मुलीला खिल्लार गाई व बैलाची अनोखी भेट देत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे!
जागतिक दुग्ध दिनाच्या पुर्वसंध्येला फुरसुंगी येथील शेतकरी रमेश हरपळे यांची कन्या कल्याणी व सोरतापवाडी येथील शेतकरी कुटुंबातील प्रकाश चौधरी यांचे चिरंजीव स्वप्निल यांचा विवाह नुकताच एका मंगल कार्यालयात संपन्न झाला. फुरसुंगी व सोरतापवाडी गावामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. परंतु या परिस्थितीत दोन्ही कुटुंबे आपली पारंपरिक शेती जोमाने करत आहेत.
दोन्ही कुटुंबे शेतकरी असल्याने आपल्या मुलीला अनोखी भेट देण्याचे कल्याणीचे वडील रमेश हरपळे व भाऊ नवनाथ हरपळे यांनी ठरवले.
त्यासाठी त्यांना दिवे येथील मामा हरिश्चंद्र झेंडे व गुलाब झेंडे यांची साथ मिळाली. नुकतेच न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने खिल्लार जातीच्या गाई व बैलांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्या उच्चशिक्षित मुलीला एक जातीवंत खिल्लार गाई व बैल देण्याचे ठरले. त्यासाठी मामाच्या मदतीने त्यांची खरेदीदेखील झाली. लग्नसमारंभात अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला नटून सजून बांधलेल्या खिल्लार गाय, वासराला पाहून वर्हाडी मंडळी अचंबित झाले. शेकडो वर्हाडी मंडळींना या गाय, बैलाचा सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
माझ्याकडे शर्यतीला पळणारी बैलजोडी आहे. त्यामुळे माझ्या बहिणीलादेखील बैलांची आवड आहे. म्हणून मी या लग्नात 'झाली' ऐवजी बहिनीना जातीवंत खिल्लार गाय व बैल दिला आहे.
– नवनाथ हरपळे,
शेतकरी, फुरसुंगी.