नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : जगभरात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढत चालले असून, भारतातही कोरोनाचा फैलाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) बंद करावी, अशा आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठविले आहे.
(Bharat Jodo Yatra) चीनसह जगाच्या अनेक देशांमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. गेल्या एका आठवड्यात जगात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत ३६ लाखाने भर पडली आहे. तर दुसरीकडे कोरोनाने दहा हजार लोकांचा बळी गेला आहे. भारतात कोरोना फैलावण्याची शक्यता लक्षात केंद्र सरकारने राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
भारत जोडो यात्रेत कोरोना नियमावलीचे सक्तीने पालन करावे. यात्रेत मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग केला जावा. यात्रेत केवळ लस घेतलेले लोक येतील, याची दक्षता घेतली जावी, यात्रेत सामील झाल्यानंतर संबंधितांनी काही दिवस आयसोलेशनमध्ये रहावे, असे सांगतानाच कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य नसल्यास देशहितासाठी ही यात्रा रद्द करावी, असे आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे.
भारत जोडो यात्रेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना फैलावण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे खासदार पी. पी. चौधरी, निहाल चंद आणि देवजी पटेल यांनी मंडाविया यांच्याकडे व्यक्त केली होती. मंडाविया यांनी त्याची दखल घेत राहुल गांधी यांना यात्रेसंदर्भात पत्र लिहिले आहे. भारत जोडो यात्रेत देशभरातील लोक सामील होत आहेत. इतर राज्यांतून लोक येत असल्याने राजस्थानात कोरोनाचा प्रसार वाढत आहे . यात्रेत सामील असलेल्या लोकांना कोरोनाची लक्षणे दिसूनदेखील येत आहेत. यात्रेतून परत गेल्यानंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांना कोरोनाची बाधा झालेली आहे, असे भाजप खासदारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते.
दरम्यान, आरोग्य मंत्र्यांनी पाठविलेल्या पत्रावरुन काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे केंद्रातील मोदी सरकार बिथरले आहे. सर्वसामान्य लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी अशा प्रकारची खेळी केली जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावून घरोघरी गेले होते का, याचे उत्तर केंद्राने आधी द्यावे, असे चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा :