पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाने विपणन हंगाम २०२३-२४ साठी खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढविण्यास मंजुरी दिली आहे. शेतमाल उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. (MSP for Kharif crops)
खरीप हंगामातील पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
मंत्रिमंडळाने २०२३-२४ साठी भात पिकाच्या सामान्य श्रेणीसाठी एमएसपीत १४३ रुपये प्रति वाढ करुन ती प्रतिक्विंटल २,१८३ रुपये केली आहे. तर मूग एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ करुन ती प्रतिक्विंटल ८,५५८ रुपये केली आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत सध्या प्रतिक्विंटल ४,६०० रुपये, तीळ प्रतिक्विंटल ८,६३५ रुपये आणि कापूस प्रतिक्विंटल ६,६२० रुपये आहे. कापूस (लाँग स्टेपल) साठी एमएसपी सध्या प्रतिक्विंटल ७,०२० रुपये आहे.
भुईमुगाच्या हमीभावातही चांगली म्हणजे ५२७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर याचा हमीभाव ५,८५० रुपयांवरुन ६,३७७ रुपयांवर गेला आहे. सूर्यफूल बियाचा हमीभाव ३,६० रुपयांनी वाढून ६,४०० रुपयांवरुन ६,७६० रुपयांवर गेला आहे. सोयाबीनचा हमीभाव ४,३०० रुपयांवरुन ४,६०० रुपयांवर गेला आहे. ही वाढ तीनशे रुपयांनी जास्त आहे. तिळाचा हमीभाव ७,८३० रुपयांच्या तुलनेत ८,६३५ रुपयांवर गेला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात देशाची अन्न सुरक्षा बळकट करण्यासोबतच पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी आणि सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती.
हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण सामान्य राहील असा अंदाज वर्तवला आहे. पण जून- सप्टेंबर दरम्यानच्या मान्सून हंगामात एल निनो हवामानाचा पॅटर्न विकसित होण्याची शक्यता ९० टक्के आहे. ज्यामुळे सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताच्या ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा सुमारे १९ टक्के आहे आणि १.४ अब्ज लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक कृषी क्षेत्रातील रोजगारावर अवलंबून आहेत.