OPPENHEIMER : अणुबॉम्बच्या निर्मात्याची दुर्दैवी गोष्ट

OPPENHEIMER
OPPENHEIMER
Published on
Updated on

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहायमर' प्रदर्शित झाला आहे. अणुबॉम्बचा बाप अशी ओळख असलेल्या ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर या अमेरिकेतल्या प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञाचा हा चरित्रपट. ज्या महत्त्वाकांक्षेने ओपनहायमरने अणुबॉम्ब बनवला, तीच महत्त्वाकांक्षा पुढे त्याला वेळोवेळी अपमानित करत गेली. एका महत्त्वाकांक्षी शास्त्रज्ञाचा हा दुर्दैवी प्रवास आता रूपेरी पडद्यावर 'ओपनहायमर'च्या निमित्ताने मांडला गेला आहे.d

ऑगस्ट 1945. दुसरा आठवडा. या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी जगाच्या इतिहासाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या घटना घडल्या जपानमध्ये. पण त्याने आख्खं जग हादरून गेलं. या घटना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला अणुबॉम्ब हल्ला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचा महासत्ता बनण्याचा मार्ग आणखीनच सोप्पा झाला. अणुबॉम्बची ताकद आणि दहशत जगाला समजली. त्यानंतर आपल्याकडेही अणुबॉम्ब असावा या विचाराने अनेक देश झपाटून गेले. ही जीवघेणी स्पर्धा सुरू करण्याचं श्रेय एकाच माणसाला जातं. तो म्हणजे अमेरिकेतला नामवंत भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर. अणुबॉम्बचा बाप! हॉलीवूडचा प्रथितयश दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन आता 'ओपनहायमर' या आपल्या सिनेमातून हा सगळा घटनाक्रम रूपेरी पडद्यावर आणतोय. 'अमेरिकन प्रोमिथियस' या ओपनहायमरच्या चरित्रग्रंथावर हा सिनेमा आधारित आहे.

न्यूयॉर्क शहरातल्या एका श्रीमंत ज्यू व्यापार्‍याचा हा पोरगा. बाप कापडाचा व्यापारी आणि आई पेंटर. शाळेत असताना ज्युलियसला इंग्रजी आणि फ्रेंच साहित्य आवडायचं. पुढे त्याला केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्रातही रस वाटू लागला. नंतर तो रसायनशास्त्र हा मुख्य विषय घेऊन डिग्रीसाठी हार्वर्डला गेला, तेव्हा त्याला फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र जास्त आवडू लागलं. ओपनहायमरचा सगळा कारभारच लहरी असायचा. एकदम टोकाचा विचार करायचा. त्याची मानसिक परिस्थितीही बर्‍याचदा नीट नसायची. सतत डिप्रेशनमध्ये असायचा. तोंडात सिगारेट ठरलेलीच. त्याचं कधी अतिउत्साही असणं तर कधी एकदमच शांत असणं सगळ्यांनाच खटकायचं. कधी कधी त्याच्या मित्रांनाच तो सायको वाटायचा. पण त्याला मात्र मित्रांपेक्षा जास्त आवडायचं ते म्हणजे फिजिक्स.

पण स्वभावाने कसाही असला तरी अभ्यासात मात्र तो प्रचंड हुशार होता. अभ्यासात गुंतला तर तासन्तास काही खातही नसायचा. फिजिक्समधल्या बाप माणसांच्या हाताखाली तो वावरत होता. त्याच्या हुशारीमुळे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीतून त्याला फेलोशिप दिली जायची. या देखण्या, उंचापुर्‍या, स्मार्ट मास्तरवर, त्याच्या शिकवण्यावर आणि त्याच्या एकंदर राहणीमानावर त्याचे विद्यार्थी फिदा असायचे. एकीकडे वेगवेगळ्या संशोधनात तो गुंतलेला होताच; तर दुसरीकडे त्याला राजकारणाचंही आकर्षण होतं. खरं तर तेव्हाच्या तरुणांसारखाच तोही कम्युनिस्ट पार्टीकडे आकर्षित झाला होता. त्याने कधी स्वतःहून पक्षात प्रवेश केला नाही. पण त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र पैसे पुरवल्याचा आरोप त्यावर होतो. अनेक डाव्या संघटनांशी त्याचे संबंध होते, असंही म्हटलं जातं. इतकंच काय, तर हिटलरच्या नाझी जर्मनीतून पळून येणार्‍या वैज्ञानिकांनाही तो पळून येण्यासाठी पैसे पुरवायचा. पुढे अमेरिकेत आणीबाणी लागू झाली, त्यावेळी त्यालाही अटक झालीच होती. ज्युलियसला वेगवेगळ्या भाषांचाही नाद होता. अनुवाद वाचण्यापेक्षा मूळ भाषेतलं साहित्य वाचण्यावर त्याचा भर असायचा. त्याने उपनिषदे आणि भगवद्गीताही संस्कृत शिकून झाल्यावरच वाचली होती. गीतेचा आपल्यावर प्रभाव असल्याचं त्याने वेळोवेळी सांगितलं होतं. जुलै 1945 मध्ये अणुबॉम्ब चाचणी यशस्वीपणे पार पडली. त्यावेळी त्याने दिलेली वादग्रस्त प्रतिक्रिया ही गीतेतल्या एका श्लोकावर आधारित होती.

श्रीकृष्णाच्या विश्वरूपासमोर नतमस्तक झालेल्या अर्जुनाला सगळ्या सृष्टीचा नाश होतोय की काय हीच भीती वाटत होती. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला आपण संहारकही असल्याचं सांगितलं होतं. हा अकराव्या अध्यायातला बत्तीसावा श्लोक ओपनहायमरने वेगळ्या अर्थाने सांगितला. ओपनहायमर म्हणाला, 'नाऊ आय हॅव बिकम डेथ. द डिस्ट्रॉयर ऑफ वर्ल्ड' म्हणजेच 'आता मी मृत्यू बनलोय. या जगाचा विध्वंसक!'

पुढे अवघ्या अडीच आठवड्यात ओपनहायमरचे हे शब्द खरे ठरले. अमेरिकेने ते अणुबॉम्ब वापरून जपानवर केलेले हल्ले प्रचंड भयानक होते. कितीतरी लोकांना आपला जीव त्यात गमवावा लागला. हे सगळं घडलं होतं ओपनहायमरच्या नेतृत्वातल्या 'प्रोजेक्ट मॅनहॅटन'मुळे. तो दुसर्‍या महायुद्धाचा काळ होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी 1941 मध्ये अणुबॉम्ब प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्याची मुख्य जबाबदारी ओपनहायमरने घेतली होती. चार वर्षं हे काम चाललं आणि 16 जुलै 1945ला पहिली अणुबॉम्ब चाचणी पार पडली. त्यानंतर ओपनहायमर कॉलर ताठ करून फिरू लागला. ही ताठ कॉलर लवकरच उतरली. 6 ऑगस्टला हिरोशिमावर हल्ला झाला. त्या संध्याकाळीही ओपनहायमर एकदम टेचात मिरवत होता. उलट हा बॉम्ब नाझी जर्मनीवर वापरता आला नाही याची त्याला खंतही होती.

9 ऑगस्टला नागासाकीवर दुसरा बॉम्ब पडला. तेव्हा मात्र ओपनहायमर आणि त्याचे सहकारी प्रचंड अस्वस्थ झाले. जपानमध्ये झालेलं भयानक नुकसान पाहून आपण हे काय बनवून बसलोय याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी हॅरी ट्रूमन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी उपरती झालेल्या ओपनहायमरला दाद दिली नाही. त्यावेळी आपल्या चुकीची आणि अमेरिकेच्या स्वार्थाची जाणीव ओपनहायमरला झाली. ओपनहायमरकडे त्यावेळी हायड्रोजन बॉम्बनिर्मितीचाही प्रकल्प होता. पण इथून पुढे आपल्या हातावर रक्ताचे डाग नको असा विचार करत त्याने या प्रकल्पातून अंग काढून घेतलं आणि त्याविषयीचं सर्व संशोधन थांबवलं. पुढे ओपनहायमरने आईन्स्टाईनसारख्या इतर मोठ्या शास्त्रज्ञांना आपल्यासोबत घेतलं. वेगवेगळ्या वैज्ञानिक संशोधनांपासून मानवतेला असणार्‍या धोक्यांबद्दल हा गट चर्चा करायचा. याचं रूपांतर पुढे वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये झालं.

ओपनहायमरने घेतलेला निर्णय सरकारला न पटल्यामुळे त्याचे कम्युनिस्ट पक्षाशी असलेले जुने संबंध उकरून काढले गेले. त्याच्यावर सतत चौकशांचा मारा केला. लोकांसमोर त्याला अपमानित केलं गेलं. हिरोशिमावर बॉम्ब टाकला, त्या संध्याकाळी ओपनहायमर याच लोकांच्या टाळ्यांचा आवाज ऐकत होता. पण नंतर मात्र याच लोकांसमोर त्याला वेळोवेळी अपमानित व्हावं लागलं. ओपनहायमरचा हा दुर्दैवी प्रवास आता नोलन पडद्यावर मांडतोय. या सिनेमासाठी त्याने खरोखरचा अणुबॉम्बही बनवलाय; एवढंच काय तर एकही व्हीएफएक्स शॉट या सिनेमात नाही, असं नोलनचं म्हणणं आहे. या सिनेमाचं बजेट आहे 800 कोटी. आता नोलन हा खर्च कसा वसूल करतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news