Ukraine Russia War : युक्रेन युद्धातील नवा पैलू

Ukraine Russia War : युक्रेन युद्धातील नवा पैलू
Published on
Updated on

युक्रेन-रशिया युद्धात (Ukraine Russia War) नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रशियन लष्करी संभाषणांचे झालेले पृथ:करण सर्वात नावीन्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे. यातून सांप्रत युद्धपद्धतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व अधोरेखित होते.

रशिया-युक्रेन युद्धात 'प्राइमर' या अमेरिकन कंपनीने युक्रेनच्या आर्टिलरी फायरखाली आलेल्या काही रशियन सैनिकांचे, सोशल मीडियावर प्रचंड गाजलेले उघड वेव्हलेन्थमधील रेडिओ संभाषण पकडले. त्यांनी टिपलेले सर्व संभाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे पकडले गेले आणि आपोआप रशियन भाषेत छापले जाऊन लागलीच त्याचे इंग्रजीत भाषांतर होऊन सत्त्वर पृथ:करणही झाले. अमेरिका व नाटो राष्ट्रे ज्या पद्धतीने आणि वेगाने युक्रेन युद्धातील रशियन रेडिओ संभाषण पकडून कारवाया करताहेत त्यावरून, सांप्रत युद्धपद्धतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व अधोरेखित होते.

युक्रेन युद्धात गुप्त किंवा सांकेतिक भाषेत न बोलता खुल्या भाषेतील अनेक संभाषणे, स्मार्टफोन व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोटोंचे पृथ:करण अमेरिका व नाटो राष्ट्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सतत करत आहेत; पण यात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीद्वारे रशियन लष्करी संभाषणांचे झालेले पृथ:करण सर्वात नावीन्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे.

युक्रेनी सेनाधिकारी आणि तंत्रज्ञ खुल्या भाषेत झालेली लष्करी संभाषणे, स्मार्टफोन व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोटोंचे पृथ:करण करताहेत; पण अमेरिका आणि नाटो राष्ट्रे प्राइमर कंपनीने शिकवलेल्या संगणकीय ज्ञानप्रणालीच्या (मशिन लर्निंग) माध्यमातून माहिती हेरगिरीत प्रवीण झाली आहेत.

अमेरिकेची प्राइमर कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सांकेतिक नावे, शब्द, सामान्य म्हणी आणि बोलीचे भाषांतर करणारे न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम ग्राहकांना विकते आहे. या कंपनीच्या ट्रान्स्फॉर्मर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशिन लर्निंग मॉडेलमध्ये, लांबलचक व गुप्त शब्दमालेला वाक्यात बदलून, त्याला भाषांतरितत करून प्रिंट करण्याची क्षमता आहे. (Ukraine Russia War)

कंपनीचे मुख्य व्यवस्थापक शॉन गौरले यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्धासाठी या कंपनीच्या तंत्रज्ञांना, रेडिओ संभाषणातील ध्वनिफितींमधील ध्वनीलहरींना पकडून त्यांना वृत्तलहरींमध्येे परिवर्तित करणे, त्या संभाषणातील इतर आवाज, संगीत, बडबड, वायफळ गोंधळ कमी करणे, रशियन बोलीचे भाषांतर आणि वृत्तछपाई तसेच त्या भाषेतील युद्धभूमी संबंधित शब्द, वाक्ये, वाक्प्रचारांना अधोरेखित करणारी सॉफ्टवेअर्स मुद्दाम बनवावी लागली होती. त्यात संशोधनात्मक बदल सुरूच आहेत. हे करण्यासाठी त्या तंत्रज्ञांना, कंपनीच्या मशिन लर्निंग मॉडेल्सना पुनर्प्रशिक्षण द्यावे लागले. या मॉडेलमध्ये बोलणार्‍याचा इंटरनेट ट्रॅफिक गुप्त (एन्क्रिप्टेड) असतो.

बोलणारा कोण हे कळत नसल्यामुळे संभाषण किंवा जागेचा पत्ता शत्रूला लागू शकत नाही. सामान्य इंटरनेट ट्रॅफिकला दूर असलेल्या होस्ट सर्व्हरकडे पाठवले जाते आणि तेथून इतरांकडे जात असल्यामुळे बोलणे आपोआप गुप्त होते. शॉन गौरले यांच्या मते, युक्रेन युद्धानंतर या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स प्रवेश करतील. प्राइमर कंपनीने ही प्रणाली इतर काही राष्ट्रांनाही दिली आहे; पण त्यांची नावे उघड केलेली नाहीत. (Ukraine Russia War)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हाती आलेले खुले संभाषण, व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोटो अशा माहितीचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते, हे युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे, असे '100 ईअर्स ऑफ रशियन इंटेलिजन्स वॉर विथ वेस्ट' या पुस्तकाचे लेखक आणि हार्वर्ड विद्यापीठातील संरक्षणतज्ज्ञ काल्डर वॉल्टन म्हणतात. उपग्रह प्रणाली, ड्रोन, इतर इमेजरी सोर्सेसच्या मदतीने मिळालेल्या माहितीवरून युक्रेनने काही रशियन जनरल्सचा खात्मा केला; पण रशियन सेना मात्र सेलफोन्स वापरत असल्यानेे त्यांचा ठावठिकाणा, संभाव्य कारवाई आणि सांप्रत मनःस्थितीची माहिती युक्रेन सेनेला सहजगत्या मिळत गेली.

ओपन सोर्स इंटेलिजन्स मिळवणे, त्याची योग्य वर्गवारी करणे आणि त्यांचे पृथ:करण करून कमीत कमी वेळेत योग्य त्या सैनिकांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे; पण कठीण काम आहे. मशिन लर्निंग टूल्समुळे इमेजरी अ‍ॅनॅलिसिस सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मिळालेल्या चित्रांची व त्यातील माहितीची वर्गवारी करणेही सोपे झाले आहे.

युक्रेन युद्धामुळे आणखी एक बाब समोर आली आहे. आजतायगत, युद्धभूमीवरील सिग्नल कम्युनिकेशन प्रत्येक राष्ट्रांच्या स्वतःच्या सिग्नल युनिट्सकडे असायचे. भारतात आजही हीच परिस्थिती आहे. या सर्व राष्ट्रीय सिग्नल युनिट्सकडे विविध संगणकीय कलाबाजीची शस्त्रे असतात; पण युक्रेन युद्धासाठी अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी सिग्नल कम्युनिकेशन टॅप करण्याची जबाबदारी प्राइमर या खासगी कंपनीला दिली. सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि इमेजरीसाठी उपग्रहांचे संचलन करणार्‍या इतरही काही कंपन्या अमेरिका, नाटो, युक्रेनला त्या सेवा पुरवताहेत. उद्या या कंपन्या हे तंत्रज्ञान या राष्ट्रांच्या शत्रूंना विकणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

आजमितीला भारतीय लष्कर सीमांवर चिनी, रशियन, पश्तून, अफगाण, अरब, चेच्येन भाषेत बोलणार्‍या शत्रूंचा, दहशतवाद्यांचा सामना करत आहे. आपल्या नागरी व लष्करी इंटेलिजन्स एजन्सीज त्यांच्यातील रेडिओ, मोबाईल, सॅटेलाईट फोनवर होणारी संभाषणे पकडतात. त्या संभाषणांच्या ध्वनिमुद्रित फिती (ऑडिओ टेप्स) क्षेत्रीय अथवा दिल्ली मुख्यालयात पाठविल्यावर त्यांचे पृथ:करण व विश्‍लेषण होऊन ती माहिती परत जमिनीवर तैनात सैनिकांपर्यंत पोहोचायला किमान पाच-सहा दिवस लागतात. त्यामुळे भारतालाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरणे क्रमप्राप्त आहे. उपलब्ध संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली विकसित करणे आणि निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लष्कराला चीनच्या तुल्यबळ बनवणे ही सामरिक आवश्यकता आहे.

भारतीय संगणक तंत्रज्ञ हुशार आहेत. किंबहुना प्राइमर आणि विविध पाश्‍चिमात्य कंपन्यांमधेही अनेक भारतीय तंत्रज्ञ असून, तेथील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासात यथायोग्य हातभार लावत असतील. आवश्यकता आहे ती अशा तंत्रज्ञांना विद्यापीठ स्तरावर ओळखण्याची, शोधण्याची आणि सेवेत घेण्याची. तथापि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक दुधारी अस्त्र आहे. कारण, ज्या अल्गोरिदमचा वापर करून तुम्ही युद्धात उतरले आहात, त्याला शत्रूचे प्रोफेशनल हॅकर्स आणि एक्सपर्टस् चुकवू आणि चकवूही शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news