कीव/मास्को ; वृत्तसंस्था : युक्रेन-रशिया युद्धाला (Ukraine-Russia war) रविवारी 44 दिवस पूर्ण झाले असून, सुरुवातीला रशिया हे युद्ध एकतर्फी जिंकेल, असे वाटत असताना युक्रेनने दिलेल्या चिवट झुंजीमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्विग्न झाले आहेत. त्यातून त्यांनी युक्रेनच्या क्रामसटोर्स्क रेल्वेस्थानकावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश देणार्या जनरल अलेक्झांडर डोरनिकोव्ह यांना रशियन सैन्याचा नवा कमांडर म्हणून नियुक्त केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत रशियाचे जनरल स्तरावरील सात अधिकारी मारले गेले आहेत. शिवाय युद्ध दिवसेंदिवस लांबतच चालले आहे. त्यामुळे पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे. जनरल अलेक्झांडर हे आक्रमक सैन्य अधिकारी मानले जातात. आता युक्रेनमधील सैन्य मोहिमांची निगराणी तेच पाहतील. यापुढे रशियाच्या युक्रेनमधील प्रत्येक कारवाईवर त्यांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे रशियाने प्रथमच नौदल, वायूदल आणि थलसेनेतील ताळमेळासाठी एक सेंट्रल कमान स्थापन केली आहे.
कीव्हच्या रस्त्यावर झेलेन्स्की आणि जॉन्सन (Ukraine-Russia war)
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेन दौर्यावर असून, जॉन्सन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी राजधानी कीव्हमधील रस्त्यांवरून फेरफटका मारत परिस्थितीची पाहणी केली. जॉन्सन यांनी युक्रेनला रशियाविरोधातील युद्धात मदत म्हणून 130 मिलियन डॉलर (9.8 अब्ज रुपये) देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आधुनिक क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रे देणार असल्याचीही घोषणा जॉन्सन यांनी केली आहे.
जॉन्सन यांनी यावेळी रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांशीही चर्चा केली आणि ब्रिटन युक्रेनसोबत उभा असून, शक्य ती मदत करणार असल्याचा विश्वास त्यांनी स्थानिक नागरिकांना दिला.