माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

जळगाव : अयोध्येत राम मंदिराचं येत्या 23 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. पण उद्घाटनामागे एक डाव असू शकतो. राम मंदिराच्या उद्घाटनाला लाखो हिंदूंना बोलवायचं. बस, रेल्वे आणि ट्रकने बोलवायचं. आणि परतताना एखादा गोध्रा घडवायचा असं होऊ शकतं. हल्ला घडवू शकतात. कोणत्या तरी वस्तीत बस जाळायची. दगडफेक करायची. माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील. घरांच्या होळ्या पेटतील. आणि त्यावर हे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील. हे डावपेच त्यांचे होतील, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे हे काल (१० सप्टेंबर) जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर जळगाव महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

25 वर्षात शिवसेनेची भाजप झाली नाही, तर काँग्रेस कशी होणार…

इंडिया आघाडीची बैठक झाली. माझा पक्ष चोरला. नाव चोरलं. तरीही उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीत किंमत होती. ते तुमच्यामुळेच झालं. या बैठकीच्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी पोस्टर लावली गेली. खरंय. बाळासाहेब तसे म्हणाले होते. पण जशी भाजपसोबत 25 वर्ष राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. मग शिवसेनेची काँग्रेस कशी होणार? तुम्ही मेहबूबा मुफ्ती सोबत बसला. मुफ्तीसोबत जाऊन भाजपचा पीडीपी झाला होता का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मी कमळाबाईची पालखी वाहणार नाही. त्यासाठी शिवसेना स्थापन झाली नाही. भाजपला कमळाबाई बोलतो. कारण शिवसेना तीच आहे याचा पुरावा देण्यासाठीच कमळाबाई म्हणतो. यापुढेही म्हणेल, असंही ते म्हणाले.

पुतळ्याची उंची ठीक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार?

गुजरात मध्ये उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून देखील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की. सध्या केंद्र सरकार हालतं आहे. सरदार वल्लभभाईं पटेल हे दूरदृष्टी असलेले व्यक्ती होते. तेव्हा त्यांनी आरएसएसवर बंदी देखील आणली होती. त्या व्यक्तीला स्वतंत्र्यप्रेम, आणि देशप्रेम काय हे कळत होतं. यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केला आहे तुम्हाला माहिती आहे. पुतळ्याची उंची ठीक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार? वल्लभभाईंनी काम केलं त्याची उंची तुम्ही गाठा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरदार पटेलांनी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा भारतात सामिल करून घेतला. ती तारीख काही दिवसात येत आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी जीनांचं निधन झालं होतं, तेव्हा काही जणांनी कारवाई पुढं ढकलण्याची मागणी केली. पण सरदार पटेलांनी सांगितलं, आज म्हणजे आजच. त्यांनी फौजा घुसवल्या, रझाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने देशात सामिल करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर पण जशी वल्लभभाईंनी मराठवाड्यात कारवाई केली तशी कारवाई मणिपूरमध्ये करायची हिंमत नाही आणि हे स्वतःला पोलादी पुरूष म्हणवून घेत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news