मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येत आहे. मी कडवट हिंदुत्ववादी असूनही तुम्ही आमच्या सोबत का येता, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर भाजपचे हिंदुत्व घर जाळणारे आणि तुमचे हिंदुत्व घरातील चूल पेटविणारे असल्याचे उत्तर मुस्लिम समाजाकडून मिळत असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे, Uddhav Thackeray ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेला संपविण्याची खुमखुमी काहींना आल्याचेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
मुंबईत शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात ठाकरे यांनी हिंदुत्व, भारतरत्न पुरस्कार, पक्षांतील फूट आदी विषयांवरून भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपचे आणि शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे आहे. मुस्लिम समाज आपल्या सोबत येत आहे. माझे आजोबा प्रबोधनकारांचे म्हणणे होते, माणसाने धर्म बनवला असून धर्माने माणूस बनवला नाही. भाजप जे करत आहे ते पाप आहे. हा विषय कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
धर्माचा ध्वज आज अडाण्यांच्या हातात गेला आहे आणि त्या ध्वजावरून आता आपल्याच धर्माचे रक्त ठिबकत आहेत, असेही ते म्हणाले.
गेल्या 56-57 वर्षांत शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतली आहेत. आताही शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची खुमखुमी काहींना आली आहे. शिवसेनेची मुळे इतक्या खोलवर गेली आहेत, की ती उपटायला गेलात तर तुम्ही मुळांसह उपटले जाल. त्यामुळे त्या भानगडीत पडू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारांवर उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी भारतरत्न पुरस्कार किती द्यायचे, कुणाला द्यायचे याचे काहीतरी सूत्र होते. हे लोक जेव्हा हयात होते, तेव्हा त्यांना यांनी पराकोटीचा विरोध केला. कर्पुरी ठाकूर यांना जनसंघाने आरक्षणावरून विरोध केला होता. आता बिहारमध्ये मते हवीत म्हणून ठाकूर यांना भारतरत्न दिले. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा अशी आमची मागणी होती. त्यांना भारतरत्न घोषित झाला आहे. मात्र, स्वामीनाथन समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करा, अशी माझी मागणी आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा लोकांचा सन्मान केला, तर त्यांचा संपूर्ण प्रदेश आपल्यासोबत येईल, असा भाजपचा समज आहे. आता एवढा सोपा काळ राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. ( Uddhav Thackeray )