श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा: सूतगिरणी परिसरात दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. येथील दारूबंदी विभागाच्या गाडीवर चालक असणारे संजय जगताप यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास धनगर वस्ती परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. सकाळी ही बाब निदर्शनास आली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. शवविच्छेदना नंतर त्यांच्यावर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जगताप यांनी आत्महत्या केली का? त्यांचा घातपात झाला? याबाबत या परिसरात चर्चा झडत आहे.
दुसरी घटना सूतगिरणी फाटा येथील रेल्वेगेटजवळ घडली. अस्तगाव येथील एका मजुराने आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीचे नाव मात्र समजू शकले नाही. या दोन्ही घटनांबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनांचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सूतगिरणी परिसरात रेल्वे रूळावर यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यातील अनेकांचा घातपात करून या ठिकाणी आणून टाकल्याचा संशयही या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. तसा प्रकार एका घटनेत निदर्शनास आलेला आहे.