‘इसिस’शी संबंधित आणखी दोघे जेरबंद; पुण्यात डॉक्टरला अटक

‘इसिस’शी संबंधित आणखी दोघे जेरबंद; पुण्यात डॉक्टरला अटक
Published on
Updated on

पुणे /ठाणे/ रत्नागिरी : टीम पुढारी:  बंदी घातलेल्या (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या देशविघातक कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार्‍या तिघांच्या मुसक्या आज (गुरुवारी) एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आवळल्या. यात पुण्यातील एक डॉक्टर, त्याच्याशी संबंधित ठाण्यातील एक आणि रत्नागिरीतील आणखी एक अशा तिघांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूडमध्ये देशविघातक कारवाया करण्याच्या आरोपाखाली दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडे सापडलेल्या घातक वस्तू आणि आक्षेपार्ह दस्तावेजावरून त्यांची झाडाझडती घेतली असता महाराष्ट्रात इसीसचे (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) मोड्युल घातपाती कारवाया करीत असल्याचे लक्षात आले. त्यांच्या चौकशीतून कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेण्यात आल्याची खळबळजनक माहिती हाती लागली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि एनआयएने संयुक्त मोहीम हाती घेतली.

त्यात महाराष्ट्रभर हे मोड्युल काम करीत असून विदर्भातील गोंदिया ते कोकणातील रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पुणे इथपर्यंत यांची व्याप्ती असल्याचे धागेदोरे हाती लागले. गुरुवारच्या अटकसत्रात तिघे जण हाती लागल्याने या मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे. गुरुवारी पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार (वय 43) याला एनआयएने अटक करून कोंढव्यातील त्याच्या घरातील झडती घेतली. त्यात बर्‍याच आक्षेपार्ह वस्तू सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् आणि 'इसिस'शी संबंधित अनेक दस्तावेजांचा यात समावेश आहे.

ठाण्यातील झुल्फिकार बडोदावालावर तरुणांच्या भरतीचे काम
पुण्यातील अदनान अली सरकार याचा साथीदार असलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी अली सरकार आणि बडोदावाला यांच्यावर देण्यात आली होती, असे कळते. मुंबईतून देखील तिघांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार अदनान अली सरकार हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी आहे. यापूर्वी याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एकास अटक केलेली आहे.

रत्नागिरीतून एकजण ताब्यात
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

देशाविरुद्ध युद्ध पुकारले
'एनआयए'च्या तपासानुसार, देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न आरोपी करत होता आणि 'इसिस'च्या कटाचा भाग म्हणून भारत सरकारविरोधात युद्ध पुकारत होता, असेही निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news