मेक्सिकोच्या संसदेत परग्रहवासीयांचे मृतदेह; एक हजार वर्षांपूर्वीचे शव दाखविले

मेक्सिकोच्या संसदेत परग्रहवासीयांचे मृतदेह; एक हजार वर्षांपूर्वीचे शव दाखविले
Published on
Updated on

मेक्सिको सिटी; वृत्तसंस्था : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही, याबाबत अद्यापही विज्ञानाने ठामपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, जगभरातून 'युफो' म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याचे तसेच एलियन्सचे अस्तित्व असल्याचे दावे केले जात असतात. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील संसदेत सुनावणीही झाली होती. आता मेक्सिकोच्या संसदेतही परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत सुनावणी झाली असून, संसदेत कथित परग्रहवासीयांचे दोन मृतदेहही दाखवण्यात आले.

हे मृतदेह तब्बल एक हजार वर्षांपूर्वीचे आहेत, ते पेरू देशातील एका खाणीत सापडले होते. मेक्सिकोचे पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जेमी मौसन यांनी संसदेत हे मृतदेह दाखवले. या सुनावणीचे संसदेतून थेट प्रसारण करण्यात आले. आता ममी बनलेल्या या कथित परग्रहवासीयांच्या मृतदेहांना एका लाकडी पेटीत ठेवण्यात आले होते. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. सुनावणीवेळी अमेरिकेतील माजी नौदल पायलट रायन ग्रेव्स हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीच अमेरिकन संसदेत दावा केला होता की, त्यांनी पायलट म्हणून सेवा बजावत असताना परग्रहवासीयांची अंतराळयाने पाहिलेली आहेत. सुनावणीवेळी हॉर्वर्ड अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांनी सरकारकडे वैज्ञानिकांसाठी एलियनवर अभ्यास करण्याची परवानगी मागितली.

एलियनच्या 'डीएनए'ची रेडिओकार्बन डेटिंग

पत्रकार जेमी मौसन यांनी सांगितले की, या मृतदेहांवर अलीकडेच ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमध्ये संशोधन करण्यात आले. या ठिकाणी वैज्ञानिकांनी त्यांच्या 'डीएनए'चे रेडिओकार्बन डेटिंगद्वारे विश्लेषण केले.

अमेरिकेतही झाली होती सुनावणी

यापूर्वी जुलैमध्ये अमेरिकन संसदेतही एलियन्सबाबत सुनावणी झाली होती. त्यावेळी अमेरिकन नौदलाचे माजी इंटेलिजन्स ऑफिसर निवृत्त मेजर डेव्हिड ग्रश यांनी दावा केला होता की, अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून 'युफो' आणि एलियन्सबाबतची माहिती जगापासून लपवत आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका 'युफो'च्या रिव्हर्स इंजिनिअरिंगवरही काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

मेजर ग्रश हे 2022 च्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या डिफेन्स एजन्सीसाठी 'यूएपी' ('युफो'शी निगडित संदिग्ध घटना) बाबतचे विश्लेषण करीत होते. सुनावणीवेळी त्यांनी सांगितले की, सरकारला एलियनशी संबंधित अंतराळयाने मिळाली होती आणि त्यावर सरकार गुप्तपणे संशोधन करीत आहे.

अमेरिकेच्या रिपोर्टमध्येही 'युफो' पाहिल्याचे दावे

2020 मध्ये 'युफो'च्या तपासणीबाबत बनवलेल्या अमेरिकन टास्क फोर्सने एक रिपोर्ट जारी केला होता. नऊ पानांच्या या रिपोर्टमध्ये अमेरिकन सरकारच्या सूत्रांच्या माध्यमातून 2004 ते 2021 या दरम्यानच्या 144 'युफों'ची माहिती देण्यात आली होती. 'पेंटागॉन' त्यांना 'अनआयडेंटिफाईड एरियल फिनॉमिना' म्हणजेच 'यूएपी' म्हणते. विशेष म्हणजे, रिपोर्टमध्ये 'युफो' पाहिल्याच्या दाव्यांची पुष्टीही केली नव्हती की, ते फेटाळलेही नव्हते; मात्र असे जरूर म्हटले होते की, अशाप्रकारचे ऑब्जेक्ट पृथ्वीवर एलियन्स येण्याचे संकेत असू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news