Udhampur Blast : अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याआधी दोन स्फोटांनी उधमपूर हादरले

Udhampur Blast : अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याआधी दोन स्फोटांनी उधमपूर हादरले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुधवारी (दि.२८) रात्री १०.३० आणि गुरुवारी (दि.२९) पहाटे ५.४० च्या दरम्यान जम्मू काश्मीर येथील उधमपूरमध्ये झालेल्या दोन स्फोटांमुळे (Udhampur Blast) देश पुन्हा एकदा हादरला. अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यापूर्वी हे स्फोट घडल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवला का ? या दृष्टीने तपास केला जात आहे. त्याच वेळी, या स्फोटांच्या काही तासांपूर्वी, नियंत्रण रेषेला (एलओसी) लागून असलेल्या पूंछ जिल्ह्यात एका महिलेला चार किलो आयईडीसह पकडण्यात आले होते. यामुळे काही काळ शांत असणाऱ्या दहशतवादी कारवाया पुन्हा सुरु झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

दरम्यान आठ तासांच्या अंतराळात उधमपूर येथे झालेल्या दोन स्फोटांबाबत पोलिस उप महानिरीक्षक मोहम्मद सुलेमान चौधरी यांनी हा स्फोट मोठा असल्याचे सांगितले. ही दहशतवादी घटना आहे की नाही, हे तपासानंतरच सांगता येईल. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या समोरच आर्मी पोलिसांचे ट्रॅफिक चेक पोस्ट-2 (उधमपूर) आहे. पुढे ते म्हणाले, हा तपासाचा विषय आहे. हा स्फोट जबरदस्त होता, त्यामुळे आणखी दोन ते तीन बसचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. ही दहशतवादी घटना असल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. सलाथिया चौकासारखा हा स्फोट होता का, असे विचारले असता, त्याचा अन्य कोणत्याही स्फोटाशी संबंध असू शकत नाही, असे देखील ते म्हणाले. बसचालक आणि जखमींची चौकशी केली जाईल, त्यानंतरच काही सांगता असे उप महानिरीक्षक म्हणाले. (Udhampur Blast)

उधमपूरमध्ये आठ तासांत दोन स्फोट झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त सध्या तरी नाही. गुरुवारी पहाटे 5.40 च्या सुमारास सुमारास दुसरा स्फोट झाला. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन स्फोटांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दलाचे पथकांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासह सुरक्षा यंत्रणेला देखील सतर्क ठेवण्यात आले आहे. (Udhampur Blast)

प्रथमदर्शनी हा दहशतवादी कट मानला जात आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून तपास सुरू केला आहे. उधमपूर येथील जुन्या महामार्गावरील टीसीपी डोमेल परिसरातील बैगरा पेट्रोल पंपावर मिनी बससह सहा बसेस उभ्या होत्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पहिला स्फोट (Udhampur Blast)

नेहमीप्रमाणे बसंतगड मार्गाची बस (JK14D-6857) सायंकाळी 6 वाजता उभी असताना रात्री 10.30 वाजता या बसमध्ये मोठा स्फोट झाला. बसचा काही भाग आणि शेजारी उभी असलेली मिनी बस (JK14G-5147) देखील चक्काचूर झाली.

बस कंडक्टर सुनील सिंग आणि मिनी बस कंडक्टर विजय कुमार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या निवासी भागातील इमारतींनाही हादरे जाणवले. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला.

स्फोटात जखमी झालेल्या बस कंडक्टर सुनील सिंग यांच्या पाठीवर छर्रे लागले आहेत. कठुआ मार्गाच्या बसचे दोन तुकडे बसंतगड मार्गाच्या बसच्या छतावर ठेवण्यात आल्याचे सुनीलने सांगितले. त्यांनी स्वत: ताडपत्रीनं सामान झाकलं आणि बसमध्ये झोपायला गेला. त्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला.

पूंछ जिल्ह्यातून महिलेला घेतले ताब्यात (Udhampur Blast)

पेट्रोल पंपासमोर लष्कराची चौकीही आहे. गुप्तचर संस्था आणि पोलीस दहशतवादी हल्ल्याचा असल्याचे नाकारत नाहीत. मात्र, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच वेळी, याच्या काही तासांपूर्वी, नियंत्रण रेषेला (एलओसी) लागून असलेल्या पूंछ जिल्ह्यात एका महिलेला चार किलो आयईडीसह पकडण्यात आले होते.

गृहमंत्री अमित शहा यांचा ३ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीर दौरा (Udhampur Blast)

गृहमंत्री अमित शाह ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी उधमपूरमध्ये झालेल्या स्फोटामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आरोपी महिला जैतून अख्तर आणि मोहम्मद रियाज नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पूंछला लागून असलेल्या राजोरी जिल्ह्यात ४ ऑक्टोबरला गृहमंत्र्यांची सभा आहे. या संदर्भात दोन्ही जिल्ह्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

एसओजीच्या इंटेलिजन्स इनपुटवर पूंछ नगरच्या मध्यभागी असलेल्या परेड पार्कमधून महिलेला बॅगसह पकडण्यात आले. आयईडी कुठून आला आणि तो कोठून नेला जात होता, याची चौकशी केली जात आहे. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शक्तिशाली स्फोटके हस्तगत करण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे मानले जात आहे.

राजोरी-पुंछमध्ये पुन्हा दहशतवादी कारस्थान तीव्र झाले (Udhampur Blast)

दहशतवादाच्या खात्मामुळे बराच काळ शांत असलेले राजोरी आणि पूंछ जिल्हे जम्मू विभागात पुन्हा दहशतवादी कारवायांच्या विळख्यात आले आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये युद्धविराम करारानंतर, गोळीबार थांबला परंतु ओव्हर ग्राउंड नेटवर्क खूप सक्रिय झाले आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत राजोरी आणि पूंछ जिल्ह्यात स्फोट, घातपाती दहशतवादी हल्ले आणि अनेक चकमकी झाल्या आहेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागातून ड्रग्ज आणि बनावट नोटांच्या रॅकेटशी संबंधित अनेक प्रकरणेही पकडली गेली आहेत.

यामुळेच लष्करप्रमुखांसहित इतर अधिकाऱ्यांनी राजोरी आणि पूंछला अनेक भेटी दिल्या आहेत. राजोरी-पुंछमधील वाढत्या हालचालींमुळे सुरक्षा ग्रीड मजबूत करण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news