पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी २० एप्रिलपासून फ्री ट्विटर 'ब्लू' टिक काढले जातील, असे जाहीर केले हेते. त्याप्रमाणे ट्विटरने गुरूवारी (दि.२०) मध्यरात्रीपासून ज्यांनी ब्लू सेवेसाठी शुल्क भरलेले नाही त्यांचे ट्विटर खात्यावरील 'ब्लू' टिक काढायला सुरुवात केली. यामध्ये ट्विटरने जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडूंच्या ट्विटर अकाऊंटवरील 'ब्लू टिक' (Twitter removed blue ticks) हटवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी, प्रियांका गांधी या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देखील ब्लू टिक हटवण्यात आले आहे.
एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून, मोठे बदल केले जात असल्याचे दिसत आहे. एलन मस्क यांनी यापूर्वी ट्विटरचा लोगो बदलला (Twitter removed blue ticks) होता. मस्क यांनी निळ्या पक्ष्याऐवजी श्वानाचा लोगो वापरला होता. हा बदलेला लोगो पाहून यूजर्स हैराण झाले. त्यानंतर पुन्हा ट्विटरचा मूळ आणि प्रसिद्ध असलेला निळा पक्षी ट्विटरच्या लोगोवर दिसू लागला.
त्यानंतर ट्विटरने पुन्हा एका निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरूवात केली आहे. ट्विटर ब्लूची सेवा खात्याची सत्यता पडताळणी यासोबत अधिक सुविधा, जसे की ट्विट एडिट करणे, अन डू करणे यासाठी सशुल्क करण्यात आली आहे. अकाउंट खात्यांची सत्यता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्यांनी या सेवेसाठी शुल्क भरलेले नाही. त्यांचे ब्लू टिक काढून टाकले आहे. दरम्यान, ज्यांचे ब्लू टिक हटवले आहे त्यांना शुल्क भरल्यानंतर ट्विटरवरील ब्लू टिक (Twitter removed blue ticks) पुन्हा मिळवता येणार आहे.
ट्विटरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दिग्गज क्रिकेट खेळाडूंचे देखील ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत. ट्विटरने शुक्रवारी (२१ एप्रिल) सकाळी आपल्या प्लॅटफॉर्मवर मोठे बदल केले. ज्यांनी ट्विटरवरील आपली निळी टिक्स गमावली आहे, त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक असलेला पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा देखील समावेश आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोचे ट्विटरवर 108.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, विराट कोहलीचे 55.1 दशलक्ष, सचिन 38.6 दशलक्ष, रोहित शर्मा 21.7 दशलक्ष आणि महेंद्रसिंग धोनीचे 8.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्विटर ब्लू टिक गमावलेल्यांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. ट्विटरवर बाबरला ४.६ दशलक्ष लोक फॉलो करतात.
शिवाय, किंग खान शाहरूख, अमिताभ बच्चन, आलिया भट यांच्या देखील अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढण्यात आल्या आहेत.
ट्विटरने २००९ पासून ब्लू टिक देण्यास सुरूवात केली होती. ट्विटर ब्लू टिकमुळे तुमचे ट्विटर अकाऊंट हे फेक नसून, ते खरे आहे. हे सांगण्यासाठी ही सेवा प्रदान केली आहे. त्यानंतर अनेक व्हेरिफाइड अकाऊंटसाठी ब्लू टिकची सेवा देण्यात आली आहे. यानंतर आता ही सेवा पेड म्हणजेच पैसे भरून दिली जाणार आहे. ट्विटरची ब्लू पेड सेवा घेण्यासाठी भारतीय चलनात मोबाईल यूजर्ससाठी प्रति महिना ११ डॉलर (९०० रूपये) तर वेब आवृत्तीसाठी ८ डॉलर (६५० रूपये) इतकी रक्कम भरावी लागणार आहे.