बरसातें – मौसम प्यार का : शिवांगी जोशी पत्रकाराच्या भूमिकेबद्दल काय सांगते?

बरसातें – मौसम प्यार का
बरसातें – मौसम प्यार का

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील बरसातें – मौसम प्यार का या मालिकेचे वेधक कथानक आणि नायक-नायिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. एका न्यूजरूमच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या मालिकेत रेयांश (कुशाल टंडन) आणि आराधना (शिवांगी जोशी) या दोन हेकेखोर व्यक्तींमधील वादळी रोमान्सचे चित्रण आहे. भावनांच्या जटिल गुंत्यात अडकलेल्या रेयांश आणि आराधनाची ही गोष्ट आहे.

पहिल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी बघितले की, आराधना ही धडाडीची पत्रकार रेयांशच्या वडिलांविषयी एका सनसनाटी स्टोरीचे रिपोर्टिंग करते. आपण मोठा पराक्रम केला असा आराधनाचा गोड समज असतो, पण रेयांश आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करून ही बाजी पलटून टाकतो आणि चुकीचे रिपोर्टिंग केल्याबद्दल आराधनाला नोकरीतून काढून टाकतो.

परंतु, आराधनाची कामावरची निष्ठा आणि निर्भिडता पाहून रेयांशचे वडील प्रभावित होतात आणि नेशन टू न्यूज या रेयांशच्या न्यूज चॅनलमध्ये तिला नोकरीचा प्रस्ताव देतात. रेयांश आणि आराधना यांची व्यक्तिमत्वं अगदी विरुद्ध असल्याने त्यांच्यात कामावरून वारंवार खटके उडतात. व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर देखील. पण आराधना रेयांशबरोबर काम करू लागते, तसा तिला त्याचा जवळून परिचय होतो आणि त्याची एक वेगळी बाजू तिला दिसू लागते. त्यामुळे त्याच्याबद्दलचे तिचे मत हळूहळू बदलू लागते आणि धोक्याच्या अनेक सूचना मिळत असतानाही ती त्याच्याकडे आकर्षित होते.

एका उत्साही आणि दृढनिश्चयी पत्रकाराची भूमिका करताना आणि बरसातें – मौसम प्यार का मालिकेत आराधनाच्या भूमिकेतून या नवीन व्यवसायाचा शोध घेताना शिवांगी रोमांचित आहे. आपला अनुभव सांगताना शिवांगी जोशी म्हणते, "पत्रकारितेविषयी मला पहिल्यापासून खूप आकर्षण वाटत आले आहे. पण आराधनाची व्यक्तिरेखा साकार करू लागल्यावर माझा पत्रकारांविषयीचा आदर अनेक पटींनी वाढला आहे. हे फारच किचकट काम आहे. कारण आपल्या अवतीभोवती जे घडते आहे. याच्या बातम्या पुरवण्यासाठी पत्रकार वाट्टेल ते करत असतात. माझ्या अभिनय करकीर्दीमुळे माझ्या आसपास अनेक पत्रकार असतात. या व्यवसायाविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी मी माझ्या खास मीडिया मित्रांशी संपर्क साधला. प्रश्न विचारण्याचे त्यांचे तंत्र, त्यांची देह बोली, आवाजातील चढ-उतार यांचे निरीक्षण केले आणि आराधना ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. मला आशा आहे की या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकेन."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news