कोल्हापूर : पुडी माव्याची… विक्री गांजाची!

कोल्हापूर : पुडी माव्याची… विक्री गांजाची!

कोल्हापूर, दिलीप भिसे : बिनभांडवली आणि शंभरपटीने मिळकत असलेल्या गांजा तस्करीतील उलाढाल वाढली आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी परिसरात मावा-गुटख्याच्या पुडीतून थेट गांजाची बिनबोभाट तस्करी सुरू झाल्याने सराईत टोळ्यांच्या मिळकतीचा धंदा फुल्ल फॉर्मात चालला आहे. शहरात मध्यवर्ती परिसरासह निर्जन ठिकाणी सायंकाळनंतर गांजाच्या पुड्यांसाठी शौकिनांची झुंबड उडालेली असते. 17 ते 25 वयोगटातील कोवळ्या पोरांचा तस्करांभोवती अक्षरश: गराडा पडलेला असतो. गोरगरिबांची पोरं या जीवघेण्या व्यसनाची शिकार ठरू लागली आहेत.

सीमावर्ती भागासह सांगली जिल्ह्यातून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी

शहरासह ग्रामीण भागातून होणारी गांजाची मुबलक तस्करी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. भक्कम तटबंदी आणि सुरक्षारक्षकांचा गराडा असतानाही मध्यवर्ती कळंबा कारागृहात गांजाचा पुरवठा होत असल्याने प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पंधरवड्यापूर्वी बंदिस्त कैद्यांना गांजा पुरविण्याचा प्रयत्न करणारा जेलचा सुभेदारच गजाआड झाल्याने गांजा तस्करीचा मुद्दा कळीचा बनला आहे. सीमावर्ती भागासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागांतून दररोज मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होऊ लागली आहे. स्थानिकांसह आंतरराज्य तस्करांनी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात गांजासह अमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे खोलवर रुजविली आहेत.

गांजा तस्करीत माफियांची भाईगिरी!

झटपट आणि विनासायास मुबलक कमाई देणार्‍या गांजा तस्करीत कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र,कर्नाटक, गोवा तसेच गुजरात व बिहारमधील नामचिन तस्करांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होऊ लागला आहे. त्यामध्ये माफिया टोळ्यांचाही समावेश आहे.व्हाईट कॉलर गुंडांच्या राजकीय आश्रयातून तस्करीचे लोण वाढू लागले आहे. गांजा सेवनाबरोबरच आता गुटख्याच्या पुडीतून गांजा सहजपणे उपलब्ध होऊ लागल्याने स्थानिक तस्करांची दिवसेंदिवस उलाढाल वाढू लागली आहे.

व्यसन नव्हे, मरण यातना..!

अमली पदार्थांसह गुटख्याच्या व्यसनामुळे कोवळ्या वयातील पोरांनाही प्रकृतीचे विकार जाणवू लागले आहेत. विशेषकरून कॅन्सरसारख्याजीवघेण्या आजारालाही तोंड द्यावे लागत आहे. अमली पदार्थ सेवनाचा सर्वाधिक परिणाम मेंदूवर होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. श्रवणक्षमता, द़ृष्टिदोष, अकाली मृत्यूचा धोका यामुळे संभवतो; पण दिवसेंदिवस गांजा तस्करांच्या कारवाया वाढतच आहेत.

सावधान… गुटख्यात गांजाच्या पावडरचे मिश्रण!

बेरोजगार तरुणांना कमिशनपोटी घसघशीत कमाईचे आमिष दाखवून त्यांना अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यात ओढले जात आहे. अमली पदार्थांच्या तस्करीबरोबरच 17 ते 25 वयोगटातील तरुणांत गुटख्याचे व्यसन प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. काही काळापूर्वी गुटख्यामध्ये गांजाच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे जादा नशा आणि जोरात किक येते, असा बोलबाला होता; पण सद्यस्थितीत गुटख्यात पाण्याऐवजी गांजापासून तयार केलेल्या पावडरचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार आरोग्याला अत्यात घातक आणि जीवघेणा ठरणारा आहे.

हे आहेत गांजा तस्करीचे अड्डे!

कधी काळी गांजाची छुप्या मार्गाने तस्करी होई. सध्या ही तस्करी बेधडक होऊ लागली आहे. मावा, गुटख्याच्या पुडीतून हमखास गांजा उपलब्ध होऊ शकतो, अशी यंत्रणा राबविण्यात येत आहे. विशेषकरून सांगली फाटा, रेल्वेस्टेशन परिसर, तावडे हॉटेल, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, राजेंद्रनगर, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम चौक परिसर, वाशी नाका, फुलेवाडी, शिंगणापूर, इराणी खण परिसर, कळंबा रोड, शिवाजी पूल परिसरात तस्करांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून येते.

कोवळी पोरं व्यसनाचे बळी!

शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, करवीर, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात नशिल्या गोळ्यांसह गांजा आणि अमली पदार्थांची होणारी तस्करी बहुचर्चित आहे. नशेच्या दोन गोळ्या तोंडात टाकल्या की, त्याची नशा चार ते पाच तास उतरत नाही. गोरगरिबांची कोवळी पोरं व्यसनाला बळी पडून आयुष्याची राखरांगोळी करून घेत आहेत. अमली पदार्थांची तस्करी गोरगरिबांच्या घरावर उठत असतानाही प्रशासन यंत्रणा तस्करांविरुद्ध ठोस पावले उचलत नाही, हे दुर्दैव आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news