Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा २८ ऑक्टोबरपर्यंत : सीमोल्लंघनानंतर देवी निद्रा घेते, जाणून घ्या धार्मिक महत्त्व…

Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा २८ ऑक्टोबरपर्यंत : सीमोल्लंघनानंतर देवी निद्रा घेते, जाणून घ्या धार्मिक महत्त्व…


तुळजापूर : तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन झाल्यानंतर श्रमनिद्रेला सुरुवात झाली असून शनिवारपर्यंत (दि. २८) ही श्रमनिद्रा सुरू राहणार आहे. दरम्यान दोन दिवसापासून तुळजाभवानी देवीला सुगंधी तेलाच्या अभिषेकाला सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीने 24 ऑक्टोबररोजी पहाटे पाच वाजता सीमोल्लंघन केले असून त्यानंतर देवी पाच दिवसाची श्रमनिद्रा सुरु आहे. अश्विन शुद्ध १० पासून अश्विन शुद्ध १५ पर्यंत ही श्रमनिद्रा सुरू राहणार आहे. या काळात देवीला सकाळी सात वाजता आणि संध्याकाळी सात वाजता भाविक भक्त आणि तुळजापूर येथील स्थानिक रहिवासी यांच्याकडून सुगंधी तेलाचे अभिषेक घातले जातात, त्याचबरोबर गुलालाची रक्षा पूजा केली जाते. (Tuljabhavani Devi)

तुळजाभवानी देवीला येणारा भाविकांची संख्या नवरात्र नंतर देखील सुरूच आहे. शहरामध्ये सर्वत्र रस्त्यावर यात्रेच्या बाजारपेठा भरलेल्या असून मोठ्या प्रमाणात भाविकांकडून खरेदी  करण्यात येत आहे. या यात्रा काळामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसादाचे दुकाने तेजीत सुरू असून हॉटेल्स आणि लॉजिंग व्यवसाय देखील जोमात सुरु आहेत. Tuljabhavani Devi)

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने यावर्षी चंद्रग्रहण होत आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या प्रतिवर्षी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये देवी सोवळ्यात असणार आहे. चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून संस्थानचे उपाध्ये बंडोपंत पाठक आणि इतर जाणकार यांच्याकडून माहिती घेऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. चंद्रग्रहण प्रत्यक्ष मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार असून दोन वाजून 30 मिनिटांनी ते पूर्ण होणार आहे दुपारी बारा वाजता चंद्रग्रहणाच्या वेदाला सुरुवात होणार आहे. चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये तुळजाभवानी देवी सोवळ्यामध्ये ठेवण्यात येईल. चांदीच्या सिंहासनामध्ये श्रीखंडाच्या सिंहासनाप्रमाणे पाणी ठेवले जाणार असून या ग्रहणाच्या कालावधीमध्ये भाविकांचे दर्शन नेहमीच सुरू राहणार आहे. दर्शनाच्या रांगा नियमितपणे चालू राहणार असल्याची माहिती मिळालेली आहे.

या संदर्भात देवीचे भोपे पुजारी सचिन परमेश्वर यांनी सांगितले, की धर्मशास्त्राप्रमाणे चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये देवी सोवळ्यामध्ये ठेवली जाणारा आहे. मध्यरात्री बारा वाजता देवीची श्रमनिद्रा पूर्ण होणार आहे. त्यानंतर देवीची मूर्ती मुख्य चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येईल. ग्रहण कालावधीदरम्यान शक्य होईल ते धार्मिक कार्यक्रम होतील त्यानंतर देव सोवळ्यात ठेवला जाईल. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर देवीला अभिषेक पूजा केली जाईल, अशी माहिती दिली.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news