तुजं माजं सपान: वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल का प्राजक्ता?

तुजं माजं सपान
तुजं माजं सपान

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे 'तुजं माजं सपान' ही सोनी मराठीवरील मालिका. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथ, या मालिकेला उजवं ठरवते. क्षेत्र मग ते कुठलंही असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्यं यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. हिच बाब वेटक्लाउड या निर्मितिसंस्थेची सोनी मराठी वाहिनीवरील 'तुजं माजं सपान' ही मालिका अधोरेखित करते आहे.

सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पहिलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा, वीरू पहिलवानासोबत लग्न करून शिराळकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करणारी प्राजक्ता लग्नानंतर आपल्या स्वप्नांना विसरून संसारात रमली खरी, पण तिचं स्वप्न तिच्यापेक्षा जास्त वीरूला छळतंय.

संसाराच्या गाड्यला जुंपून न घेता कुस्तीगीर बनण्याचं आपलं स्वप्न प्राजक्तानं पूर्ण करावं त्यासाठी एक नवरा म्हणून तसेच एक नामांकित कुस्तीगीर म्हणून वीरू आपल्यापरीने प्राजक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आईच्या जुनाट विचारांना न जुमानता, आईच्या रोषाला सामोरं जाऊन वीरू प्राजक्ताला कुस्ती खेळण्याचं आव्हान देतो. तिच्या पैलवानकीच्या प्रवासात साथ देण्याचं वचनही देतो, पण प्राजक्ता वीरूचं मन राखू शकेल का..? वीरू प्राजक्ताला पुन्हा तालमीत आणू शकेल का..? समाजानं बांधून दिलेल्या चौकटीत प्राजक्ता आपल्या स्वप्नांना तिलांजली देईल की वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल..?

तुमच्याही मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं असेल, हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेचा विशेष महाएपिसोड २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news