आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर ( Anil Babar ) यांचे आज आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण आटपाडी तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण तालुक्यामध्ये शोककळा पसरली. आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावात बंद पाळत अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
संबंधित बातम्या
आमदार अनिल बाबर ( Anil Babar हे आटपाडी- खानापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असा प्रवास करत त्यांनी जनसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत समाजकारण व राजकारण केले. दुष्काळी आटपाडी तालुक्याला वरदान ठरणारी टेंभू योजना निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. टेंभुच्या सहाव्या टप्याला त्यांच्या पाठपुराव्याने मंजुरी मिळाली. संपूर्ण तालुक्यामध्ये टेंभुचे पाणी पोहचवण्याचे काम आमदार अनिल बाबर यांनी केले आहे.
आटपाडी येथील उपजिल्हा रुग्णालय, ग. दि. मा नाट्यगृह, अनेक बंधारे, रस्ते आणि विविध मोठी कामे आमदार बाबर यांच्या माध्यमातून पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आटपाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रात त्यांनी भरघोस निधी दिल्याने आटपाडी शहराचे रूप पालटणार आहे. आटपाडी तालुक्यात आमदार बाबर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या कामात रमणारा आणि लोकांच्यात राहणारा आमदार हरपल्याने आटपाडी तालुक्याची मोठी हानी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.