माणसाच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण

माणसाच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण

वॉशिंग्टन : अमेरिकेत 62 वर्षे वयाच्या एका रुग्णाच्या शरीरात जनुकीय सुधारणा केलेली डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रत्यारोपण आहे. शनिवारी मॅसाच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमध्ये चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 1954 मध्ये याच हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. आता रिक स्लेमॅन नावाच्या रुग्णामध्ये डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच त्यांना डिस्चार्जही दिला जाईल.

डॉक्टरांनी सांगितले की, ही नवी किडनी म्हणजेच मूत्रपिंड अनेक वर्षे कार्यरत राहू शकते. अर्थात, प्राण्यांच्या अवयवांचे मानवी शरीरात प्रत्यारोपण केल्यावर निर्माण होणार्‍या स्थितीबाबत अद्याप अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. या शस्त्रक्रियेच्या यशाने भविष्यात प्राण्यांच्या अवयवांच्या प्रत्यारोपणाबाबत अधिक आशा निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी ब्रेन डेड व्यक्तींच्या शरीरात परीक्षणासाठी डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली होती. आता जिवंत व्यक्तीमध्ये अशा किडनीचे प्रथमच प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

मानवी दात्याकडून मिळणार्‍या किडनीच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण असतात; मात्र त्याची कमतरता असते. अशा वेळी डुकराच्या किडनीचा हा पर्याय आशादायक ठरत आहे. डुकराच्या शरीरातील अवयव मानवी शरीरात अधिक अनुकूल ठरू शकतात, असे यापूर्वीच आढळले होते. काही दिवसांपूर्वीच मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचेही प्रत्यारोपण करण्यात आले होते.

हजारो लोकांसाठी प्रत्यारोपणास होकार : रुग्ण रिक स्लेमॅन

हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या एका लेखी निवदेनामध्ये रुग्ण स्लेमॅन यांनी म्हटले आहे की, ते गेल्या अकरा वर्षांपासून हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण कार्यक्रमात सहभागी आहेत. अनेक वर्षे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त राहिल्यानंतर 2018 मध्ये त्यांच्यावर एका मानवी किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. पाच वर्षांनंतर या किडनीमध्येही खराबीची लक्षणे दिसू लागली आणि 2023 मध्ये त्यांचे डायलिसिस पुन्हा सुरू झाले. गेल्या वर्षी ही समस्या गंभीर झाल्यावर डॉक्टरांनी डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर किडनीच्या गंभीर आजाराशी झुंजत असलेल्या हजारो लोकांसाठी मी त्याला होकार दिला!

logo
Pudhari News
pudhari.news