पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उध्दव ठाकरे हेच दसरा मेळावा घेत आले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी दसरा मेळावा घेण्याचा परंपरागत हक्क त्यांचाच आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी दुसरे मैदान घ्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक साखर परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सध्याचे भाजपचे सरकार घाबरले आहे. कारण शिवसेना फोडून ज्या पध्दतीने सत्ता मिळवली आहे, त्याबद्दल जनसामान्यांमध्ये नाराजी असून लोकांना ते आवडलेले नाही. त्यामुळेच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत असल्याचेही पाटील म्हणाले.
प्रताप सरनाईक यांच्या मागे एकेकाळी ईडी लागलेली होती. त्यांना न्यायालयात जाऊन नो कॉज अॅक्शन घ्यावी लागली होती आणि आता त्याच ईडीने सर्व चौकशी केलेली दिसते आणि प्रताप सरनाईक यांच्याबाबाबत आता कोणताही दोष नाही या निष्कर्षापर्यंत ईडी आल्याची दिसते. हे परिवर्तन कशामुळे? हे सर्वांना माहिती आहे. केवळ पक्ष बदलला की असे होत आहे. देशात इन्कम टॅक्स, ईडी आणि अन्य एजन्सीचा गैरवापर सुरु आहे. तो सर्वांना दिसत आहे. त्याचे उत्तम उदाहरण प्रताप सरनाईक यांच्या रुपाने दिसत आहे. कारण राजकीय विचार बदलले की त्यांचे प्रकरण क्लोजर रिपोर्टपर्यंत आले आहे. ईडी सत्तारुढ पक्षाकडे येत नाही तर विरोधी पक्षांकडे येऊ शकते, असे अनेकांनी भाष्य करुन सांगितले आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नसल्याचेही पाटील म्हणाले.
फॉक्सवॅगन वेदांता प्रकल्प अन्य राज्यांत गेल्याची जबाबदारी ही शिंदे सरकारचीच आहे. दिल्ली दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी करीत राज्यातील सुमारे तीन ते चार लाख बेरोजगारांना नोकरी मिळण्याच्या आशेवर पाने पुसली गेल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्याबद्दल शुभेच्छा देतो. मात्र, त्यांच्याच वाढदिवशी देशात चित्ते आणणे हा एक वेगवगळा योगागोग जुळून आल्याचीही टिप्पणी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघांना अन्य पक्षांनी टार्गेट केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्याने काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याठिकाणी खंबीर आहे. राज्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती न होण्यामागे दोघांमध्ये मतभिन्नता असावी. लवकर निर्णय होत नसल्याने पालकमंत्री घोषित करण्यास उशीर होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौर्याबद्दल छेडले असता ते म्हणाले, ते विदर्भात दौरा करताय ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी स्वतःच्याच पक्ष वाढीसाठी काम केल्यास आनंद वाटेल. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत अजित पवारांची नाराजी ही माध्यमांनी उठविलेली चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांनी संघटित करायला त्यांना जमले तर ते यशस्वी ठरतील. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यांना पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी व्हायचे की नाही याबाबत त्यांच्या पक्षाने अजून आमच्याशी चर्चा केलेली नसल्याचेही ते म्हणाले.