मागोवा 2023 : आरोग्यक्षेत्राने अनुभवले ’कभी खुशी, कभी गम’

मागोवा 2023 : आरोग्यक्षेत्राने अनुभवले ’कभी खुशी, कभी गम’

सरत्या वर्षामध्ये कोरोनाच्या संकटापासून दिलासा मिळाला असला तरी डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शनसह एच3एन2 या
एन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग आढळून आला. शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचारांचा निर्णय दिलासा देणारा ठरला. ड्रगतस्कर ललित पाटीलच्या पलायनाने ससून रुग्णालयासह संपूर्ण आरोग्य क्षेत्र हादरून गेले. पुण्यात विविध घटनांमध्ये तीन बड्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

कोरोनानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांना उपचार मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी 'आरोग्यमित्र' नेमण्यात आले. खासगी रुग्णालयांमधील तक्रारींसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. आरोग्यप्रमुखपदी डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
आरोग्य विभागाने सहा प्रमुख रुग्णालयांची क्षमता वाढविण्यासाठी आराखडा तयार केला. मात्र, अद्याप काम प्रत्यक्षात झालेले नाही. समाविष्ट गावांमधील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक यावर भर देण्यात आला.

महापालिका क्षेत्रात 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित', 'जागरूक पालक, सुदृढ बालक' हे राज्य शासनाचे अभियान राबविण्यात आले. नांदेड जिल्हा रुग्णालयात अपुर्‍या औषधसाठ्यांमुळे काही बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची गंभीर दखल घेत सरकारने औषध खरेदीचे अधिकार जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अत्यावश्यक औषधांची खरेदी शासकीय रुग्णालयांना स्थानिक पातळीवर तत्काळ औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध होत आहे. औंध जिल्हा रुग्णालयात मोफत उपचारांचा निर्णय यशस्वीपणे राबविला जात आहे.

ललित पाटील प्रकरण गाजले
ड्रगतस्कर ललित पाटीलने ऑक्टोबरमध्ये ससून रुग्णालयातून पलायन केले आणि ससून प्रशासनाचे वाभाडे निघाले. ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कैद्यांना दिल्या जात असलेल्या आश्रयाबद्दल आणि पोलिस, डॉक्टरांच्या कैद्यांशी असलेल्या हितसंबंधांबाबतचे महत्त्वाचे वृत्त 'दै. पुढारी'ने प्रकाशात आणले. त्यानंतर ससून प्रशासनाने तातडीने सर्व कैद्यांची कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करण्यात आले, तर डॉ. ठाकूर यांचा पदभार काढून घेण्यात आला. ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

ससून रुग्णालयात नव्या सुविधा
ससून रुग्णालयात रोबोटिक आर्मच्या साहाय्याने पहिली शस्त्रक्रिया पार पडली. कॅन्सरचे पूर्वनिदान करण्यासाठी 'पेट सीटी स्कॅन मशिन' कार्यान्वित करण्यात आले. गंभीर अवस्थेत दाखल होणार्‍या रुग्णांना अतितातडीचे उपचार देण्यासाठी ससूनमध्ये 'कोड ब्लू' टीम स्थापन करण्यात आली. त्याचप्रमाणे रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागू नयेत, यासाठी 'नो प्रीस्क्रिप्शन पॉलिसी' राबविण्याचा प्रयत्न झाला.

यंदाचे वर्ष कारवाईचे

यंदा पुण्यात आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्याचे
दिसले. ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्यासाठी 16 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यावर अँटिजेन किट घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची बदली करण्यात आली.

मेडिकल कॉलेजचे काम अपूर्णच
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षाचे वर्ग आणि प्रयोगशाळा नायडू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू होणार असल्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेण्यात आला. मात्र, वर्षअखेरीस अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news