पुणे : आघाडी घेतली अन् शेवटपर्यंत टिकली..! धंगेकर यांचे सर्वच फेर्‍यांमध्ये वर्चस्व

पुणे : आघाडी घेतली अन् शेवटपर्यंत टिकली..! धंगेकर यांचे सर्वच फेर्‍यांमध्ये वर्चस्व

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चुरशीच्या ठरलेल्या कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीत मिळविलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत टिकविली. भाजपला लक्षणीय मते मिळणार्‍या सदाशिव, नारायण, शनिवार पेठेत या वेळी मोठे मताधिक्य मिळाले नाही. पूर्वेकडील पेठांमधील मतदारांनी धंगेकरांच्या पदरात मतांचे भरघोस दान टाकले. मतदान रविवारी झाल्यानंतर मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता कोरेगाव पार्कमधील शासकीय धान्य गोदामात प्रारंभ झाला.

पहिल्यांदा टपालाद्वारे आलेली मते मोजण्यात आली. त्यानंतर फेरीनुसार मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रत्येक फेरीत 14 मतदानकेंद्रातील मते मोजण्यात आली. मतमोजणीच्या वीस फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी झाली.धंगेकर नगरसेवक होते, त्या कसबा पेठ, कागदीपुरा, तांबट आळी या भागात मतमोजणीची पहिली फेरी झाली अन् धंगेकरांनी एकोणतीसशे मतांची आघाडी घेतली.

बुधवार पेठ तसेच भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरामधील शनिवार पेठ येथे दुसरी फेरी, तर प्रभाग 15 मधील शनिवार, नारायण, सदाशिव पेठेत तिसर्‍या फेरीतील मतदान केंद्रे होती. या दोन्ही फेर्‍यांमध्ये रासने यांना अडीच हजार मतांची आघाडी मिळाली. मात्र, पहिल्या फेरीतील धंगेकरांची आघाडी त्यामुळे संपुष्टात आली नाही.

तिसर्‍या फेरीअखेर धंगेकरांची साडेचारशे मतांची आघाडी राहिली. हक्काच्या भागातच मोठी आघाडी न मिळाल्याने भाजपचे धाबे दणाणले, तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह दुणावला. त्याची माहिती समाजमाध्यमातून पुणे शहरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यावर या कार्यकर्त्यांनी भर दिला. पहिल्या तीन फेर्‍यांमध्ये धंगेकरांना 11 हजार 121 मते, तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना दहा हजार 667 मते मिळाली.

त्यानंतर चौथ्या फेरीत रासने नगरसेवक होते तो प्रभाग 15 आणि धंगेकर यांचा प्रभाग 16 या मधील मतदानकेंद्रावरील मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये धंगेकरांनी आघाडी साडेबाराशे मतांनी वाढविली. पाचव्या फेरीत बुधवार पेठ आणि प्रभाग 17 मधील रास्ता पेठ येथील मतमोजणीत धंगेकरांनी मताधिक्य दीड हजारांनी वाढविले.

सहाव्या आणि सातव्या फेरीत प्रभाग 15 मधील मतमोजणी पुन्हा झाली. मुख्यत्वे सदाशिव पेठ आणि बुधवार पेठेच्या काही भागातील या मतमोजणीत रासने यांना केवळ दोन हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले. त्याचवेळी विरोधक आक्रमकपणे विजयाचा दावा करू लागले. त्यावेळी धंगेकरांचे मताधिक्य बाराशेपर्यंत घसरले होते.

सदाशिव, बुधवार पेठेसोबतच रविवार आणि गणेश पेठेतील केंद्रांवर आठव्या फेरीत झालेल्या मतमोजणीत धंगेकरांनी मुसंडी मारत दोन हजार मतांनी आघाडी वाढविली. नवव्या फेरीत भवानी, रविवार आणि गणेश पेठेत धंगेकरांनी अकराशे मतांची आघाडी घेत एकूण मताधिक्य साडेचार हजारांपर्यंत वाढविले.

दहाव्या आणि अकराव्या फेरीत रासने यांनी धंगेकरांचे मताधिक्य एक हजाराने कमी करण्यात यश मिळविले. त्यावेळीही धंगेकरांची सव्वातीन हजार मतांची आघाडी होती. या दोन फेर्‍यांमध्ये प्रभाग 15 आणि प्रभाग 29 या दोन प्रभागातील सदाशिव, रविवार, शुक्रवार, सेनादत्त, नवी पेठ हा भाजपला अनुकूल असलेला भाग होता. या दोन प्रभागातच भाजपला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती.

बारावी फेरीही याच भागात झाली आणि धंगेकरांनी तेथे एक हजार मतांची आघाडी घेतली. हक्काच्या भागातच मताधिक्य न मिळाल्याने, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पराभव मान्य केला. अनेक नेते मतमोजणी केंद्रातून परत निघू लागले. त्या वेळी धंगेकरांचे मताधिक्य सव्वाचार हजार होते.

उत्साह शिगेला अन् गुलालाची उधळण
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पराभव मान्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या स्थानिक नेत्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करतानाच माध्यमांसमोर राज्यातील सत्तारूढ सरकारविरोधी प्रतिक्रिया दिल्या. दोन्ही गटांची जुगलबंदी गाजत होती. शिवसैनिक अधिक आक्रमकपणे त्यांचे मुद्दे मांडताना दिसत होते. तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते मोठ्या उत्साहात प्रतिक्रिया देत होते. गुलालाची उधळण होऊ लागली.

अन् धंगेकरांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतले…
या वातावरणात धंगेकर यांचे आगमन दुपारी दोनच्या सुमाराला मतमोजणी केंद्रावर झाले. त्यांचे नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. दुपारी अडीचच्या सुमाराला धंगेकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी घोषित केले. धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news