Tomato Flu : टोमॅटो फ्ल्यूची दहशत: केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना

Tomato Flu : टोमॅटो फ्ल्यूची दहशत: केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात टोमॅटो फ्लूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. केरळमध्ये या आजारांनी संक्रमित बालकांचे प्रमाण वाढत आहे. इतर राज्यातही टोमॅटो फ्लूचे रुग्ण समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने एक सविस्तर अहवाल जारी करीत टोमॅटो फ्लूची लक्षणे आणि त्यावरचे उपचार जाहीर केले आहेत. केंद्राकडून टोमॅटो फ्लू बाबत सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यातील निर्देशांचे पालन करून मुलांना टोमॅटो फ्लूपासून  (Tomato Flu) वाचवता येईल, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

टोमॅटो फ्लू (Tomato Flu) हा संसर्ग पाच वर्षांखालील मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. देशात आतापर्यंत या फ्लूची लागण झालेल्या बालकांमध्ये ० ते ९ वर्ष वयोगटातील बालकांचा समावेश आहे. या फ्लूमध्ये खूप ताप, जुलाब, सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात. हा फ्लू आणि त्याची लक्षणे चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखीच असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे फ्ल्यूची लागण झालेल्यांनी ५ ते ७ दिवस स्वत:ला वेगळे ठेवावे, आजार पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, व्हायरल संक्रमित मुलांना इतर मुलांबरोबर खेळू देऊन नये, खेळणी शेअर करू नये, फोडांना हात लावू नये, फोडांना हात लावल्यानंतर लगेच हात धुवा, संक्रमित मुलांचे कपडे, भांडी वेगळी करावी, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

शिवाय आजारी पडलेल्यांना पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे, जलद उपचारांसाठी झोप प्रभावी आहे, संक्रमित व्यक्तीशी त्वरित संपर्क टाळा, ताप किंवा पुरळाची लक्षणे असलेल्या मुलांना मिठी मारू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका, रोगाचा प्रसार टाळण्यासाठी मुलाला नाक वाहताना किंवा खोकल्याच्या बाबतीत रुमाल वापरण्यास प्रोत्साहित करा, खाज सुटल्यास खाजवू नका, अशा सूचना देशवासियांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे टोमॅटो फ्लू आणि टोमॅटोचा काही संबंध नसल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या रोगामध्ये टोमॅटोच्या रंगासारखे फोड शरीरावर दिसतात, यामुळे याला टोमॅटो फ्लू म्हटले जाते. टोमॅटो फ्लू झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, थकवा, सुजलेले सांधे, घसा खवखवणे आदी त्रास होतो. तापाच्या दोन-तीन दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागतात. तोंडाच्या आत, जिभेवर किंवा हिरड्यांमध्येही फोड येतात, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news