संसद हिवाळी अधिवेशन : आजच्या घडीला विश्वाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसद हिवाळी अधिवेशन : आजच्या घडीला विश्वाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली : संसदेचे हे अधिवेशन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होत आहे. या दरम्यान भारताकडे आलेले G20 चे अध्यक्षपद हे अभिमानास्पद आहे. दरम्यान आजच्या घडीला विश्वाच्या भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत; असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या प्रसंगी संसद सभागृहाला संबोधित करताना ते बोलत होते.

सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी नव्या संधी लक्षात घेतल्या जातील. तसेच या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे देखील मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले आहे.

आमच्या सभागृहाचे उपाध्यक्ष हे एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत. त्यांनी सैनिक शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जवान आणि शेतकरी यांच्याशी त्यांचे जवळचे नाते असल्याचे म्हणत त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आज राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

संसद वारंवार बाधित झाल्याने युवा खासदारांना शिकावयास मिळत नाही

सततच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज पुरेसे चालत नाही आणि याच्या परिणामी युवा खासदारांना जे शिकावयास हवे, ते शिकायला मिळत नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

संसदेत आम्हाला बोलावयास मिळत नाही, अशी वेदना युवा खासदारच नव्हे तर विरोधी पक्षांचे खासदार देखील बोलून दाखवितात. अर्थात सदनाचे कामकाज सुरळीतपणे चालत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भभवते. यामुळे आपणा सर्वांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत सर्व नेत्यांनी व पक्षांच्या गट नेत्यांनी ही वेदना समजावून घेउन संसद चालू द्यावी. संसदेची उत्पादकता वाढली तर त्यात देशाचे भले आहे, हे लक्षात घ्यावे. हिवाळी अधिवेशनात चर्चेचा स्तर उंचावेल, अशी आपणास आशा आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण याआधी आपण १५ ऑगस्टपूर्वी भेटलो होतो. १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली होती. आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. आपण अशावेळी भेटत आहोत की जेव्हा देशाला जी — 20 राष्ट्रसमुहाचे अध्यक्षपद मिळाले आहे. जी 20 चे अध्यक्षपद मिळणे ही मोठी संधी आहे. जगासमोर भारताची क्षमता दाखविण्याची हीच वेळ आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news